कुंवरसिंग सुभाष ठाकूर (वय ३४) आई सिद्धी ठाकूर (वय २१, दोघेही रा. तुकाईनगर, हिंगणे खुर्द) अशी ताब्यात घेतलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव येथील सिंहगड कॉलेजच्या पाठीमागे गोदावरी हॉस्टेल आहे. या होस्टेलच्या पाठीमागील परिसरात जंगल आहे. काही दिवसांपूर्वी ठाकूर दाम्पत्याने अपंग बाळाला जन्म दिला होता. बाळाच्या उपचारांसाठी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र, डॉक्टरांनी हे बाळ कधीही पूर्ण बरे होऊ शकणार नाही, असे सांगितले होते. त्यामुळे आईने बाळाचा गळा आवळून जीव घेतला आणि ठाकूर दाम्पत्याने बाळाला वडगाव बुद्रुक परिसरातील जंगलात खड्डा खोदून पुरले. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सिंहगड रोड पोलिसांना घटनेची माहिती समजली. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खातरजमा केली. मंगळवारी रात्रभर त्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बुधवारी सकाळी तहसील कार्यालयाला याबाबत माहिती देण्यात आली. तहसीलदारांच्या परवानगीने तो खड्डा खोदण्यात आला. त्यानंतर बाळाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे उलगडा
ठाकूर दाम्पत्याला दोन ऑक्टोबरला मुलगा झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांना होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून बाळ दिसत नसल्याची कुणकुण पोलिस कर्मचाऱ्यांना लागली. त्यांनी चौकशी केल्यानंतर त्या मुलास दाम्पत्याने जंगलात पुरल्याची माहिती मिळाली. अधिक चौकशी केल्यानंतर सर्व घटनेचा पर्दाफाश झाला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times