पानिपत: हरयाणाच्या पानिपतमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीने आपल्या पत्नीला दीड वर्ष टॉयलेटमध्ये बंद करून ठेवलं होतं. तिला उपाशीपोटी ठेवायचा. तसेच तिला बेदम मारहाण करत होता. महिलेला टॉयलेटमधून बाहेर काढल्यानंतर तिची अवस्था बघून तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या डोळ्यांत पाणी आलं. बाहेर काढल्यानंतर सुरुवातीला तिने जेवण मागितलं.

जिल्ह्यातील सनौली परिसरात ही घटना घडली. येथील रिशपूर गावातील रामरती (वय ३५) हिला पती नरेशने साधारण दीड वर्षापूर्वी टॉयलेटमध्ये कोंडून ठेवले होते. महिलेला वाचवण्यासाठी पोलीस आणि महिला पोलिसांचे पथक नरेशच्या घरी पोहोचले. नरेश घराबाहेर बसून जुगार खेळत होता. पोलिसांच्या पथकाने त्याला रामरतीबद्दल विचारणा केली. त्यावेळी तो स्पष्टपणे काही सांगू शकला नाही. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने पोलिसांना घराच्या पहिल्या मजल्यावर नेले. ती टॉयलेटमध्ये असल्याचे त्याने सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांनी टॉयलेटचा दरवाजा उघडला असता, आतमध्ये महिला होती. तिची अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला.

महिलेच्या अंगावर मळलेले कपडे होते. अंगाला दुर्गंधी येत होती. तिची प्रकृती ढासळलेली होती. अवस्था पाहून ती बऱ्याच दिवसांपासून टॉयलेटमध्ये बंद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तिला चालताही येत नव्हते. महिला कर्मचाऱ्यांनी तिला उचलले. तिने बाहेर येताच जेवण मागितले. कर्मचाऱ्यांनी तिला आंघोळ घातली. तिला स्वच्छ कपडे घातले. त्यावेळी तिने बांगड्या आणि लिप्स्टिकची मागणी केली. नरेशने सांगितले की, दहा वर्षांपूर्वी रामरतीचे वडील आणि भावाचे निधन झाले होते. तेव्हापासून तिचे मानसिक संतुलन ढासळले होते. कुणालाही इजा पोहोचवू नये आणि कुठेही निघून जाऊ नये यासाठी तिला टॉयलेटमध्ये बंद केले होते. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते का, याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केली. मात्र, तो देऊ शकला नाही. त्यानंतर आरोपी नरेशविरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. रामरतीला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here