पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी वाधवान पितापुत्रांची आर्थर रोड तुरुंगातून तूर्तास सुटका होणार नाही. त्यांना तुरुंगाऐवजी घरातच नजरकैदेत ठेवण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली.
राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ते मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यांना तुरुंगाऐवजी घरात नजरकैदेत ठेवण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाविरोधात राज्य सरकारने तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ईडीच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आरोपींना जेल कोठडीतच ठेवण्याची मागणी केली. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पूर्णपीठापुढे यावर सुनावणी झाली. मेहता यांनी युक्तिवाद केला की पीएमसी बँक घोटाळ्यात सात हजार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे आणि उच्च न्यायालयाने बुधवारी सुनावणीच्या वेळी काहीसा वेगळा निर्णय दिला. या पितापुत्रांना कोठडीऐवजी त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले तर ते त्यांना जामीन मिळाल्याप्रमाणेच असेल, असेही मेहता म्हणाले.
दरम्यान, उच्च न्यायालयाने बुधवारी वाधवान पितापुत्रांची मालकी असलेल्या एचडीआयएलची मालमत्ता लिलावातून विक्री करण्यासाठी त्रिसदस्यीस समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. पीएमसी बँक खातेदार सरोश दमानिया यांनी यासंदर्भात हायकोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या आर्थिक घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार असलेल्या आरोपींची मालमत्ता जप्त करुन तिचा तातडीने लिलाव करावा आणि त्यातून खातेदारांचे पैसे परत करावे, अशी प्रमुख मागणी या याचिकेत केलेली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times