म. टा. प्रतिनिधी, सांगलीः मिरज-सलगरे या राज्यमार्गावर मल्लेवाडी येथे ओढ्याच्या पुलावरून जाताना तिघे वाहून गेले. यातील दोघांना वाचवण्यात यश आले. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. कृष्णा नदीची पाणी पातळी ३५ फुटांवर गेली असून, नदीकाठच्या गावातील लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू झाले आहे. शहरातील कर्नाळ रोड येथे जगदंबा कॉलनीत पुरात अडकलेल्या २२ जणांची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने २० गावांचा संपर्क तुटला आहे, तर ७१ मार्ग पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यात सलग सहाव्या दुवशी सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. नद्या, नाले, ओढ्यांसह रस्त्यांवरूनही दोन-तीन फूट पाणी वाहत असल्याने प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. मिरज-सलगरे मार्गावर मल्लेवाडी येथे गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ओढ्यावरील पूल ओलांडताना तिघे वाहून गेले. यात जयश्री संजय दुरुरे (वय ४०, रा. मल्लेवाडी, ता. मिरज) या महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेचा पती संजय धनपाल दुरुरे (४८) आणि धोंडिराम लालासाहेब शिंदे (६२, रा. मल्लेवाडी) यांना परिसरातील तरुणांनी वाचवले.

गेल्या २४ तासात सांगली जिल्ह्यात सरासरी ८७ मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम राहिला. जत तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पलूस तालुक्यात सर्वाधिक १३० मिमी पावसाची नोंद झाली. कोयना धरणातून ३४ हजार २११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी सांगलीत ३५ फुटांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात तब्बल २५ फूट पाणी पातळी वाढली.

वारणा धरणातूनही १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर आहे. पुराचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कृष्णा आणि वारणा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अतिवृष्टीने जिल्ह्यातील ७१ मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी पर्यायी मार्गांचा वापर सुरू आहे. दरम्यान, अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले.

सांगलीत २२ जणांना पुरातून बाहेर काढले

जोरदार पावसामुळे सांगलीतील कर्नाळ रोड परिसरात ओढ्याला पूर आल्याने जगदंबा कॉलनीतील पाच घरांना पाण्याचा वेढा पडला होता. या घरांमध्ये अडकलेल्या २२ जणांना बाहेर काढण्यात महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेला यश आले. यात दोन महिने आणि सहा महिन्यांच्या दोन बालकांचाही समावेश आहे. दोन तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. दरम्यान, मीरा हाउसिंग सोसयाटी, भीमनगर, कर्नाळ रोड परिसरातील लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू केले. नदीची पाणी पातळी वाढत असल्याने नागरिकांनी स्वतःहून सुरक्षित स्थळी पोहोचावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

जिल्ह्यातील पाऊस (मिलीमिटरमध्ये)

पलूस – १३०

खानापूर- विटा – १०६

मिरज – ९७.६

आटपाडी – ९७

वाळवा – ९७.७

कवठेमहांकाळ – ९०.६

तासगाव – ८६

कडेगाव – ७०

शिराळा – ६०.७

जत – ५०

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here