पंढरपूरः उजनी, वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात महापुराची संकट उभे राहिले असून चंद्रभागेच्या सर्व पुलांवर पाणी आल्याने सोलापूर, नगर भागातील वाहतूक बंद झाली आहे. याच पाण्यामुळे गोपाळपुराच्या पुलावरही पाणी आल्याने विजापूरकडे जाणारी वाहतूकही बंद झाली आहे. दरम्यान, राज्यात चक्री वादळामुळे अतिवृष्टीचा इशारा दिला असतानाही उजनी धरणातून पाणी कमी न केल्याने एकाच दिवशी १० हजारावरून थेट अडीच लाख क्युसेक एवढा विसर्ग सोडण्याची वेळ आली आणि यामुळेच पंढरपूरसह अनेक गावावर पुराचे संकट आले आहे. यानंतर आज दिवसभर धरण व्यवस्थापनाने आपली चूक दुरुस्त करीत अडीच लाखाचा विसर्ग पुन्हा १ लाख क्युसेक पर्यंत कमी केल्याने उद्या पंढरपुरावरील पुराचे संकट कमी होणार आहे.

आज या महापुरामुळे अभियांत्रिकीसाठीची सीईटी परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना रस्ते बंद झाल्याने परीक्षा न देताच परत फिरावे लागले आहे. उद्याही अशीच स्थिती राहणार असल्याने या सीईटीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार असल्याने या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी मिळावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

परतीच्या पावसाचा दणका पंढरपूरसह सांगोला, मंगळवेढा, अकलूज परिसरही पावसाचा जोरदार दणका बसल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करीत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. आज शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई, लखुबाई झोपडपट्टी सह आंबेडकर नगर, घोंगडे गल्ली, संत पेठ भागात पुराचे पाणी शिरले आहे. आज सायंकाळी उजनी धरणातून १ लाख क्युसेक तर वीर धरणातून २३ हजार क्युसेक निसर्गाने पाणी सोडण्यात येत होते. पुणे व सातारा जिल्ह्यातील पाऊस थांबल्यास पुराचा धोका संपणार आहे. आज अकलूज येथेही ग्रामदैवत असलेल्या आकलाई देवीच्या मंदिरात नीरा नदीचे पाणी शिरले असून आता वरिष्ठ पातळीवरून उजनी व वीर धरणाचे पूरनियंत्रण करावे लागणार असल्याची नागरीकातून मागणी होत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here