राज्यात गेल्या काही दिवसांपासून बंद मंदिरे पुन्हा सुरू करण्यासाठी भाजपनं आंदोलनाचा आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. त्यानंतर आता, प्रकाश आंबेडकर यांनीही राज्य सरकारवर याच मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. ‘इतर राज्यांनी मंदिरं आणि आर्थिक केंद्र चालू करून अर्थव्यवस्थेला गती दिली, परंतु महाराष्ट्र शासन त्या दृष्टीने काहीही पावलं उचलत नाही. उलट बेभरवशावरच ठेवलेलं आहे असं एकंदरीत दिसत आहे.’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
‘केंद्रानं लॉकडाऊन उठवण्यासाठी दिलेल्या गाइडलाइन्स महाराष्ट्र शासन मान्य करायला तयार नाही. इतर राज्यांत मी सुद्धा फिरतो आहे. इतर राज्यांनी मंदिरं उघडली, तिथला व्यवसाय व भक्तांसह दोघांचीही सांगड घातली. परंतु, अजुनही महाराष्ट्र शासन मंदिरं उघडायला तयार नाही, अशी परिस्थीती आहे. दुसऱ्या बाजूस इतर राज्यांनी आर्थिक घडामोडी सुरू केल्या आहेत. परंतु, महाराष्ट्र शासन त्या दृष्टीने काहीच पावलं उचलत नाही. उलट बेभरवशावरच ठेवलेलं आहे असं एकंदरित दिसत आहे. महाराष्ट्र शासनाने पुरोगामीत्व व निर्णय घेणारं राज्य, असं पुन्हा उभं करावं,’ अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
‘महाराष्ट्र शासन हे पुरोगामी शासन, आता ते हळूहळू प्रतिगामी व्हायला लागलं आहे. करोना लॉकडाउन उठवतांना केंद्राने अनेक दिशानिर्देश दिले, परंतु महाराष्ट्र शासन त्यांना मान्य करायलाच तयार नाही. आरोग्य सेतूचे अॅप आले, त्यातून लोकांची तब्येत कशी आहे हे कळते. करोनाबाधित आहे की नाही हे कळते. परंतु महाराष्ट्र शासनाने अजुनही लॉकडाउन उठवला नाही, अशी परिस्थिती आहे. कदाचित या व्हिडिओनंतर उठवतील,’ असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times