वाचा:
फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भाजप नेते एकनाथ खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जलयुक्त शिवारबाबत अनेक तक्रारी सरकारकडे आहेत, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले होते. त्यानंतर या योजनेत गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार असेल तर चौकशी करा, असे फडणवीसांनी स्वतःहून सरकारला आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारने या ठिकाणी चौकशी करायचे ठरवलेले आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. या योजनेत काही गैरव्यवहार असल्यास किंवा कोणी दोषी असल्यास तथ्य बाहेर येईलच, असेही एकनाथ खडसेंनी पुढे नमूद केले.
वाचा:
दरम्यान, एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी उघड पंगा घेतला आहे. पक्षात सातत्याने अन्याय होत असताना वरिष्ठ पातळीवरून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने पक्ष नेतृत्वावरही ते नाराज आहेत. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करत असले तरी खडसेंबाबतचा सस्पेन्स मात्र वाढत चालला आहे. खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत व पक्षात त्यांना मानाचं पद देण्यात येईल आणि त्यांच्या ज्येष्ठतेला अनुसरून राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रिपदही त्यांना मिळेल, अशी चर्चा आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्यांची वर्णी लावण्यात येणार असल्याच्याही बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी जलयुक्त शिवारच्या चौकशीबाबत दिलेली प्रतिक्रिया फारच सूचक अशी आहे. एकीकडे भाजपचे सर्वच नेते या चौकशीवर तोफा डागत असताना खडसे यांनी मात्र सरकारचा निर्णय योग्य आहे व यातून सत्य बाहेर येईल, असे सांगून एकप्रकारे महाविकास आघाडी सरकारची बाजू घेतली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times