सांगली: जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दाणादाण उडवली. अतिवृष्टीमुळे नद्या आणि ओढ्यांना आलेल्या पुरातून वेगवेगळया घटनांत तिघे वाहून गेले. मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे जयश्री संजय दरुरे (वय ४०) या मल्लेवाडीच्या ओढ्यातून वाहून गेल्या. जत तालुक्यातील करजगी-भिवर्गी पुलावरून पिंटू धायगुडे (३०, रा. सनमडी) हा तरुण वाहून गेला, तर आटपाडी तालुक्यात तडवळे येथील एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला. ( Latest Updates )

आणि धरणातून विसर्ग सुरू असल्याने सांगलीच्या आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी रात्री उशिरा ३७ फुटांवर पोहोचली. माणगंगा, अग्रणी, बोर आणि येरळेला पूर आला आहे. जिल्ह्यातील ५५ पूल पाण्याखाली गेले आहेत, तर ९० मार्ग बंद झाले आहेत. शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू झाले आहे. कवठेमहांकाळमध्ये अग्रणी नदीला पूर आला आहे. या पुरात एक दुचाकी व दोन जनावरे वाहून गेली. पावसामुळे शेतीने मोठे नुकसान झाले आहे. डाळींब, द्राक्ष, भुईमूग, ऊस, तूर, ज्वारी, मका, भाजीपाल्याचे कोटयवधींचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे प्रशासनाने सुरू केले आहेत.

अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पलूस तालुक्यात पावसाने उघडीप दिली असली तरी, कोयना धरणातून पाणी सोडल्याने नागठाणे व आमणापूर बंधारा पाण्याखाली गेला. यामुळे अंकलखोप, पलूस, नागठाणे गांवाचा संपर्क तुटला आहे. कडेगावमध्ये दोन पूल वाहून गेले. शिवणी- वडीयेरायबाग पुलावर पाणी आले. आटपाडीमध्ये माणगंगेला पूर आला आहे. तालुक्यातील १९ पूल पाण्याखालीच आहेत. तालुक्यातील अनेक ओढ्यांना पूर आला आहे. यामुळे रस्ते बंद असून शहरातील ३६ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here