म. टा. प्रतिनिधी, : ‘मी अतिरेकी बोलतोय,… रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवला आहे,’ असा पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून खोटी माहिती देणाऱ्याला पोलिसांच्या ‘एटीसी’ पथकाने अटक केली. भागवत रामदास पाराशर (वय २७, रा. शेलगाव पिशोर, ता. कन्नड), असे त्याचे नाव आहे. ही घटना पाच ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता घडली होती.

पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाला फोन आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी बॉम्ब शोधक पथकासह रेल्वे स्टेशनवर धाव घेऊन पहाटे साडेपाच ते सकाळी सातपर्यंत संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, काहीही सापडले नव्हते. फोन करणारा जानकी लॉजसमोर, सावंगी हायवे रोड, पोखरी शिवार येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्याला गुरुवारी जाधववाडी भागातून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक बनकर, पोलिस निरीक्षक प्रमोद कटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एटीसी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक छोटुराम दुबे, पोलिस नाईक मनीष सूर्यवंशी, मच्छिंद्र जाधव यांनी केली. भागवत पाराशर हा आईकडे राहतो. तो भाजीपाला विकून, तसेच हॉटेलवर दोनशे रुपये रोजाने जाऊन उदरनिर्वाह करतो. त्याने हे कृत्य नशेत केले असावे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्याच्याविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here