म. टा. प्रतिनिधी, पुणे

अतिवृष्टीमुळे पुण्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला जबाबदार असल्याची टीका करत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री महापालिकेच्या कारभारावर शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. ‘बांधकाम व्यावसायिकांनी पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडविले असताना, महापालिकेनेही पावसाळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने करायची कामे का केली नाहीत, याचा आढावा घेणार आहे’ असेही त्यांनी सांगितले.

करोनाची सद्यस्थिती आणि विविध विकास कामांच्या आढाव्यासाठी विधान भवन येथे बैठक घेण्यात आली; तसेच पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आठ रुग्णवाहिकांचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुणे महापालिकेच्या कारभारावर टीकास्र सोडले.

वाचा:

पवार म्हणाले, ‘विकासकामे करत असताना, बांधकाम व्यावसायिकांनी पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडविले आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याला वाहून जाण्यासाठी मार्ग मिळत नसल्याने दुर्घटना घडत आहेत. पुण्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला पुणे महापालिका जबाबदार आहे. महापालिकेने पावसाच्या पार्श्वभूमीवर काही कामे करायला हवी होती. संरक्षक भिंती बांधणे आणि अन्य कामे का झाली नाहीत, याचा आढावा घेणार आहे. शहर कोणतेही असो, विकासकामे ही झाली पाहिजेत’

प्रशासनाला कामाला लावले आहे!

‘अतिवृष्टीमुळे पुण्यासह लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत नुकसान झाले. राज्यावर आलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाला कामाला लावले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सूचना दिल्या आहेत. नुकसानग्रस्त भागात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) पथके पाठविणे, बोटींची व्यवस्था करण्यात येत आहे. राज्यावर आलेल्या या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकार सज्ज आहे’ असे त्यांनी स्पष्ट केले.

निकषापेक्षा अधिक मदत द्यावी लागणार

‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे राज्य सरकारचे बारकाईने लक्ष आहे. ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाले आणि नद्यांची पाणी वाहून जाण्याची क्षमता राहिली नाही. अनेकांची घरे पाण्याखाली गेली असून, नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले आहे. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना ठरावीक निकषापेक्षा जास्त मदत द्यावी लागणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे’ असेही ते म्हणाले.

‘पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार बाधितांना राज्य सरकारकडून मदत दिली जाणार आहे. मात्र, केंद्र सरकारनेही मदत केली पाहिजे’ असे त्यांनी सांगितले. ‘राज्यात अनेक पुलांचे नुकसान झाले आहे. पुलांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे पुलांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वाहतूक पूर्ववत होऊ शकेल’ असे त्यांनी सांगितले.

वाचा:

वाचा: ‘

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here