म. टा. प्रतिनिधी, ठाणे: वागळे इस्टेटमधील एका महिलेची पाच हजारामध्ये सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या एका फरारी आरोपीच्या तब्बल २० वर्षानंतर गुन्हे शाखेने (युनिट १) गुजरातमधून मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपीच्या साथीदाराचा पाच वर्षांपूर्वीच मृत्यू झाल्याची बाब चौकशीत समोर आली असून, महिलेच्या पतीनेच हत्येची सुपारी दिली होती.

वागळे इस्टेटमधील रघुनाथनगरमध्ये राहणारे कुंदन रावल आणि त्याची पत्नी कुंदा या दाम्पत्यामध्ये भांडणे होत असत. त्यामुळे पत्नीचा कायमचा काटा काढण्यासाठी कुंदन याने गावावरून भेटण्यासाठी आलेल्या शंभू रावल आणि सुरेश नाव्ही यांना पाच हजाराची सुपारी दिली. दोघेही मुळचे गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यातील आहेत. सुपारी घेतल्यानंतर त्यांनी कुंदाची फरशीच्या सहाय्याने घरातच हत्या केली आणि फरार झाले. त्यावेळी तिचा पती बाहेर गेला होता. १८ फेब्रुवारी २००० रोजी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कुंदनला अटकही केली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. मात्र, हत्या करणाऱ्या शंभू आणि सुरेशचा पोलिसांना काहीच ठावठिकाणा लागला नाही. या आरोपींचा ठाणे गुन्हे शाखा युनिटकडूनही शोध घेण्यात येत होता. त्याच दरम्यान, दोन्ही आरोपी विजापूर तालुक्यातील गवाडा या गावी असल्याची माहिती पोलिस हवालदार संभाजी मोरे यांना मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांचे पथक बुधवारी गुजरातला रवाना झाले. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन गुरुवारी शंभु याला अगोदर ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत सुरेश याचा ५ डिसेंबर २०१५ रोजी मृत्यू झाल्याची बाब निष्पन्न झाली. मृत्यूचे प्रमाणपत्रही पोलिसांनी प्राप्त केले आहे.

या हत्येविषयी शंभुकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत तो आणि त्याच्या साथीदाराने ५ हजार रुपायांची सुपारी घेऊन महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. अशा प्रकारे २० वर्षानंतर फरारी आरोपीच्या हातात बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेला यश आले.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच बजावली महत्वपूर्ण कामगिरी…

९ ऑक्टोबर रोजी हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडत असताना या आरोपीने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक जखमी झाले होते. या हल्ल्यानंतरही पोलीस पथकाने आरोपीला अटक केली होती. सरक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बरे झाल्यानंतर तात्कळ ते कामावर हजर झाले. त्यांनी हत्या प्रकरणातील फरारी आरोपीला अटक करण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली.

आणखी बातम्या वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here