अलिकडे काही महिने कोरोनाने जिल्हा त्रस्त झाला आहे,प्रशासनाचे प्रयत्नही रुग्ण सेवा देण्यासाठी अपुरे पडत आहेत,अशा वातावरणात जिल्ह्यासाठी दिलासा देणारा एक निर्णय शासनाने जाहीर केला आहे.
सिंधुदुर्ग येथे नियोजित स्थापन करण्याकरीता राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण खाटांचा वापर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.त्याबाबतचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला असून त्याची प्रत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आ.दीपक केसरकर, आ.वैभव नाईक यांना सुपूर्त केली आहे.
मुख्यमंत्री यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा केली होती.आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांनुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालयाकरीता किमान ३०० खाटांचे रुग्णालय सोईसुविधांसह उपलब्ध असणे आवश्यक आहे.भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्याकरीता सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण खाटांचा वापर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. 29 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत वर्षा निवासस्थानी झालेल्या कोकणातील आमदारांच्या बैठकीत आ.दीपक केसरकर व आ.वैभव नाईक यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आग्रही मागणी केली होती.तसेच आ.वैभव नाईक यांनी वारंवार आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता.खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांनीही यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता दिल्याबद्दल कुडाळ मालवणचे आमदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी राज्यमंत्री आ.दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत.आता लवकरात लवकर हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times