म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

अभिनेत्री कंगना रणौटच्या वांद्रे पाली हिल येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची अडवणूक केली आणि त्यांच्या सरकारी कामात अडथळे आणले, अशा तक्रारीच्या एफआयआर प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे वार्ताहर यांना मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.

‘ज्या ठिकाणी तोडकामाची कारवाई होत होती त्याठिकाणी प्रदीप यांनी पैसे देऊन १५-२० माणसांना गोळा केले. ती माणसे घोषणा देऊन आंदोलन करत होते. अशाप्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि पोलिसांच्याही कार्यवाहीत अडथळा आणला’, असे खार पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ (हल्ला), कलम १८८ (सरकारी कर्मचाऱ्याने काढलेल्या आदेशाचे उल्लंघन) व कायद्यातील संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे भंडारी यांनी अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. ‘मी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला चढवलाच नसल्याने कलम ३५३ लागूच होत नाही. शिवाय हे कलम नंतर समाविष्ट करण्यात आले’, असा दावा भंडारी यांच्यातर्फे करण्यात आला.

‘सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचे काहीही एफआयआरमधून उघड होत नाही. शिवाय एफआयआरमध्ये कलम ३५३ हे एक आठवड्यानंतर समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे सरकारी कर्तव्यापासून रोखले की नाही, याविषयी सरकारी कर्मचारीच अनभिज्ञ होता, असे दिसते. पैसे देऊन घोषणा देण्यास लावणे, हा येथे गुन्हा होत नाही. एकंदरीत आरोपीची कोठडीतील चौकशी आवश्यक दिसत नाही’, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने अखेरीस भंडारी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्याचवेळी पोलिस बोलावतील तेव्हा चौकशीसाठी खार पोलिस ठाण्यात हजर राहण्याची अटही न्यायालयाने त्यांना घातली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here