मुंबईः नेहमीच बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबईतील वांद्रे न्यायालयाने कंगनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कंगनाची बहिण रंगोलीविरोधातही एफआयआर दाखल करण्यास सांगण्यात येत आहे.

वांद्रे कोर्टात मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैयद यांनी कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली आहे. कंगनानं बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच, टी.व्ही, सोशल मीडिया या माध्यामांतून ती बॉलिवूडविरोधात बोलत आहे. कंगना सातत्याने घराणेशाहीच्या मुद्द्यावरून बॉलिवूडवर टीका करतेय, असा आरोप याचिकेत केला आहे.

कंगनानं बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारांमध्ये तणाव निर्माण केला आहे. ती सातत्याने अक्षेपार्ह ट्विट करतेय. तिची ही ट्विट धार्मिक तेढ निर्माण करणारे आहेतच पण यामुळं फिल्म इंटस्ट्रीमधील काही लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असंही या याचिकेत म्हटलं आहे. याचिकाकर्त्यांनी कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडिओ कोर्टात पुरावे म्हणून सादर केले आहेत. त्यानंतर कोर्टानं कलम १५६ (३) अंतर्गंत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

या प्रकरणी वांद्रे पोलिस स्थानकात कंगनाविरुद्धात तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता. या नंतर याचिकादारांनी कंगनाविरोधात वांद्रे कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानंही या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यासंबंधी आज तक या वृत्तवाहिनेनं वृत्त दिले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॉलिवूडविरोधात कट रचणाऱ्यांना सज्जड दम भरला होता. ‘बॉलीवूडला गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत,’ अशा इशाराच त्यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here