नेरूळमधील सेक्टर ६ मध्ये बनावट स्कॉच या विदेशी मद्याची विक्री होणार असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप यांचे आदेश आणि संचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संताजी लाड, दिपक परब यांच्या पथकाने सापळा रचून कारमधून ५४ सिलबंद बाटल्यांसह एकूण ६ लाख ७८ हजार ९० रुपायांचा मुद्देमाल जप्त केला.
यावेळी अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब पुढे आली. सानपाडा येथील सेक्टर १ मध्ये सोसायटीमध्ये असलेल्या गोदामात हलक्या प्रतीच्या परराज्यातील विदेशी मद्यापासून उच्च प्रतीची बनावट स्कॉच तयार करण्याचा व्यवसाय केला जात होता. या माहितीनंतर तात्काळ पथकाने याठिकाणी छापा टाकत विविध ब्रँडचे लेबल्स, रिकाम्या बाटल्या, ड्रायर मशीन, बुच, मद्यसाठा जप्त केला. येथून जप्त केलेल्या मुद्देमालाची किमंत ७ लाख २४ हजार आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शिबीन दिनेश तियर याला अटक करण्यात आल्याची माहिती निरीक्षक संताजी लाड यांनी दिली. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य एक आरोपी फरारी असून त्याचा शोध सुरू आहे. मागील एक वर्षापासून हा व्यवसाय सुरू असल्याचे लाड यांनी सांगितले. कमी श्रमात झटपट श्रीमंत होण्यासाठी आणि केवळ नफा मिळवण्याच्या उद्देशाने आरोपी मद्यसेवन करणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळत होते, असेही लाड यांचे म्हणणे आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times