पावसामुळं भुईमुग, सोयाबीन यांच्यावर परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी पिके भुईसपाट झाली आहेत. ही पिके आणखी काही दिवस पाण्यात राहिल्यास ती वाया जाण्याची भीती आहे. कणसात पाणी साठल्याने ज्वारी काळी पडण्याचीही भीती आहे. पुणे आणि सांगली जिल्ह्यातील फळबागांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान नेमके किती आहे, याचा नेमका अंदाज घेण्यासाठी व नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यातील नेते मैदानात उतरले आहेत. आज आजित पवार, सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील पुरस्थितीची पाहणी केली. तर, उद्यापासून शरद पवारही मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील काही भागांत निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे, पवारांच्या बारामतीतून देवेंद्र फडणवीस त्यांच्या दौरा सुरू करणार आहेत.
१९ ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस बारामतीपासून दौऱ्याची सुरूवात करणार आहेत. त्याचबरोबर, कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा परंडा या भागातही पाहणी दौरा करणार आहेत. २० ऑक्टोबर रोजी ते उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यात दौऱ्यावर असणार आहेत. तर, दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ते हिंगोली, जालना आणि औरंगाबादमधील पूरामुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी
राज्यात निर्माण झालेल्या या पूरस्थितीमुळं मुख्यमंत्र्यांनी आत्तातरी प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी होत आहे. तर, विरोधकांनीही शेताच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौरा करावा अशी टीका केली आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री पाहणी दौरा कधी सुरू करणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times