जळगाव: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या हत्याकांडाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर, या प्रकाराची वाच्यता होऊ नये म्हणून तिच्यासह चारही भावंडांची कुऱ्हाडीने वार करत अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे हत्याकांड पीडितेच्या मोठ्या भावाच्या चार मित्रांनीच केले आहे. पीडितेचे आई-वडील आणि मोठा भाऊ बाहेरगावी गेलेले असताना, या चारही नराधमांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते. याच संधीच गैरफायदा घेत त्यांनी क्रूर कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

परिस्थितीजन्य पुरावे आणि श्वानपथकाच्या मदतीने पोलीस संशयितांपर्यंत पोहचले आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुकेश संन्याल, राज उर्फ गुड्ड्या, सुनील सीताराम अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या तिघांसह एका अल्पवयीन आरोपीचा देखील या गुन्ह्यात सहभाग आहे.

भिलाला कुटुंबीय मोठ्या मुलाला घेऊन मध्यप्रदेशातील आपल्या गढी या मूळगावी नातेवाईकाच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी गेलेले होते. तेथून परत येताना रात्र झाल्याने ते आपल्या दुसऱ्या नातेवाईकांकडे मुक्कामी थांबले होते. बोरखेडा येथे घरी चारही मुले एकटी असल्याने, त्यांच्या मोठ्या भावाने काळजी म्हणून आपल्या चारही मित्रांना काळजी घेण्यास सांगितले होते. मात्र, नराधम मित्रांनी दारूच्या नशेत मध्यरात्री भिलाला यांच्या घरी जाऊन सुरुवातीला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. यावेळी इतर तिघे भावंडे झोपेतून जागे झाले. त्यानंतर नराधमांनी पीडित मुलीसह चारही भावंडांच्या गळ्यावर कुर्‍हाडीने वार करून त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

हत्याकांडाची ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गावाला गेलेल्या मृतांच्या मोठ्या भावाला विचारपूस केली. त्याने घराकडे लक्ष ठेवण्यासाठी ज्या मित्रांना सांगितले होते, त्यांची नावे पोलिसांना सांगितली. पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी घटनाक्रम उलगडला.

दरम्यान, संशयित आरोपी अजूनही पोलीस तपासात काहीशी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. काही पुराव्यांचे संकलन केले जात असल्याने पोलिसांनी अजूनही या घटनेचा उलगडा झाल्याचे जाहीर केलेले नाही. नराधमांनी हत्याकांडात वापरलेली कुऱ्हाड, संशयितांचे रक्ताने माखलेले कपडे, घटनास्थळी मिळालेल्या देशी दारूच्या दोन बाटल्या अशा वस्तू जप्त केल्या आहेत.

पीडितेवर सामूहिक अत्याचार?
या घटनेत अल्पवयीन पीडितेवर सामूहिक अत्याचार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. पीडितेच्या मृतदेहावर झालेल्या शवविच्छेदनात तिच्यावर अत्याचार झाल्याचे प्रथमदर्शनी पुरावे मिळाले आहेत. तिच्या गळ्यावर जखमांच्या खुणा आहेत. नराधम अत्याचार करत असताना ती प्रतिकार करत असल्यामुळे या जखमा झाल्याचा वैद्यकीय सूत्रांचा अंदाज आहे. पीडितेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आलेला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पीडितेवर अत्याचार झाल्याबाबत पुष्टी मिळणार आहे.

गृहमंत्री जळगावात

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे आज दुपारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पीडित कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अनिल देशमुख हे मुंबईहून विमानाने जळगावात येत आहेत. दुपारी ३ वाजेला ते बोरखेडा येथे येतील. पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते परत मुंबईला जाणार आहेत.

पीडित कुटुंबीयांना २ लाखांची तातडीची मदत
या घटनेनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची तातडीची मदत करणार असल्याची घोषणा केली होती. या घटनेचा तपास योग्य दिशेने सुरू असून लवकरच आरोपी जेरबंद होतील, असा विश्वासही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here