मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीबद्दलचे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी मागे घेतले असतानाच हाजी मस्तानचा दत्तक मुलगा सुंदर शेखरने राऊत यांच्या विधानाला पुष्टी देणारी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. त्यामुळे राऊतांवर टीकेचे बाण सोडणारा महाआघाडीतील घटक पक्ष काँग्रेसची गोची होण्याची शक्यता आहे.

दिवंगत इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीचा मी साक्षीदार आहे, असे म्हणत राऊतांनी जे सांगितलं ते खरंच असल्याचा दावा सुंदर शेखरने केला आहे. इंदिरा गांधी या करीम लाला व हाजी मस्तान यांना अनेकदा भेटल्या होत्या. मी स्वत: या भेटींचा सक्षीदार राहिलो आहे. इंदिरा गांधी मुंबईत येणार असतील तर करीम लालास त्याबाबत दोन दिवस आधीच माहिती मिळायची, असा दावा शेखरने केला.

इंदिरा गांधी व करीम लाला-हाजी मस्तान भेटीचा मी साक्षीदार असलो तरी त्यांच्यात नेमकी कोणती चर्चा व्हायची हे मात्र मी आता सांगू शकणार नाही. ७० ते ८०च्या दशकातील ही गोष्ट आहे. तेव्हा मी खूप लहान होतो, असेही पुढे सुंदर शेखरने नमूद केले. इंदिरा गांधी-करीम लाला यांच्या भेटीचा राष्ट्रपती भवनातील फोटोही समोर आला आहे. त्याबाबत विचारले असता हा फोटो खरा असल्याचे सुंदर शेखरने सांगितले.

हाजी मस्तानची बाळासाहेबांशी मैत्री

इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच आणखीही अनेक नेते करीम लालाला भेटण्यासाठी यायचे. माझे वडील हाजी मस्तानचेही काँग्रेसशी चांगले संबंध होते. काँग्रेसचे अनेक नेते त्यांचे मित्र होते. याशिवाय दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही माझ्या वडिलांची चांगली मैत्री होती, असा दावा सुंदर शेखरने केला.

पवार, बाळासाहेबही भेटायचे

सुंदर शेखरच्या आधी करीम लालाचा नातू सलीम पठाणनेही संजय राऊत यांच्या विधानात काहीच गैर नसल्याचे सांगितले आहे. इंदिरा गांधीच काय माझ्या आजोबांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच बाळासाहेब ठाकरेही येत असत असा दावा सलीमने केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here