म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : जागतिक नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात १०.३ टक्के आक्रसणार हे केलेले भाकित आणि त्यापाठोपाठ भारताचा दरडोई जीडीपी हा बांगलादेशच्या दरडोई जीडीपीपेक्षाही खाली जाण्याची वर्तवलेली शक्यता यामुळे गुरुवारपासून देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत अगदी सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण होत आहे. यासंदर्भात काही अर्थतज्ज्ञांशी चर्चा केली असता असे आकडे फारसे मनावर घ्यायचे नसतात, त्याचवेळी धोरणकर्त्यांनी गाफील राहू नये, असे मत व्यक्त झाले आहे.

यासंदर्भात सीए डॉ. योगेश सातपुते यांनी मटाला सांगितले की, आपला दरडोई जीडीपी बांगलादेशच्या दरडोई जीडीपीपेक्षाही खाली घसरण्याची जागतिक नाणेनिधीने वर्तवलेली भीती तितकीशी योग्य नसली तरी नजरेआड करण्यासारखीही नाही. अशी तुलना पाहताना दोन्ही देशांच्या लोकसंख्येशी ही बाब ताडून पाहणे गरजेचे आहे. बांगलादेशची लोकसंख्या सुमारे १७ कोटी तर आपली १३० कोटी. त्यामुळे दोन देशांची तुलना याबाबतीत होऊ शकत नाही. जागतिक नाणेनिधीने दिलेली आकडेवारी दरडोई आहे. म्हणजेच एकूण जीडीपीला लोकसंख्येने भागले आहे. बांगलादेशपेक्षा आपली लोकसंख्या तब्बल साडेसात पटीने अधिक आहे. शिवाय ही आकडेवारी प्रत्यक्ष आकडेवारी नसून ती प्रोव्हिजिनल आहे हेही लक्षात घ्यायला हवे. आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेपेक्षा किमान दसपट आहे, याकडेही सातपुते यांनी लक्ष वेधले.

भारतीय अर्थव्यवस्थेची मूलतत्त्वे खंबीर असून देशाने जागतिक बाजारपेठांतून आपला ठसा उमटवला आहे. आपण एकाचवेळी देशांतर्गत कामकाज, उद्योगवृद्धी, कृषी व सहकृषी उद्योग, सामाजिक सुरक्षितता, सायबर सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध, निर्यात-आयात, विदेशी चलन व्यवहार, नागरिकांचे आरोग्य, सीमांवरील शांतता, देशांतर्गत शांतता व सौहार्द या सर्व आघाड्यांवर निर्णय घेत आहोत. गेल्या जवळजवळ सहा-सात महिन्यांपासून उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे देशात बेरोजगारी वाढत आहे, अस्थैर्य वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केवळ आकड्यांचे खेळ करून भारतीय अर्थव्यवस्था कशी संकटात आहे हे वारंवार बिंबवून भारतीयांचे मनोबल खच्ची करण्यासारखाच हा प्रकार असल्याचे एक अर्थतज्ज्ञाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. असे असले तरी धोरणकर्त्यांनी कोणत्याही प्रकारे गाफील राहू नये आणि अधिक जाणीवपूर्वक पावले उचलावीत, जेणेकरून आर्थिक विकासाची गती कायम राखण्यात यश मिळेल, याकडेही या अर्थतज्ज्ञाने लक्ष वेधले आहे.


अर्थतज्ज्ञांनी या मुद्द्यांकडे वेधले लक्ष
– ही आकडेवारी प्रोव्हिजिनल आहे, प्रत्यक्ष नव्हे

– बांगलादेशात जूनपासूनच अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. आपल्याकडे अद्याप पूर्णपणे अनलॉक झालेले नाही

– बांगलादेशची लोकसंख्या १७ कोटी तर आपली १३० कोटी

– आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार बांगलादेशी अर्थव्यवस्थेपेक्षा दसपट मोठा

– आपण जनतेच्या संरक्षणासाठी अधिक काळ देशातील कामकाज किंवा देश बंद ठेवला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दूरगामी होणे साहजिक

– ही सर्व आकडेवारी अस्थायी स्वरूपाची आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here