वाचा:
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत ते बोलत होते. जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी करोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्याची ग्वाहीही या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली. पण स्टीम बाथ, सोना बाथ, शॉवर, झुम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार ‘एसओपी’तील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
वाचा:
जीम, व्यायामशाळा या आरोग्यासाठीच आहेत. पण त्यामुळे आरोग्याचे प्रश्न वाढू नयेत याची काळजी घ्यावी लागेल. मोठ्या शहरांबरोबरच राज्यातील ग्रामीण भागातही जीम, व्यायामशाळा यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना तयार करण्यात आलेल्या ‘एसओपी’चे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. हा व्यवसाय आहे, पण तसा तो जनतेच्या आरोग्याशी निगडीत आहे, याचे भान राखणे आवश्यक आहे. आता रुग्णसंख्या कमी होते आहे. पण युरोप खंडातील उदाहरणांवरून आपल्याला सावधही रहावे लागेल. आपण अनेक निर्बंध शिथील करत आहोत. पण यातून हळू-हळू गाफिलपणा वाढू नये यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वाचा:
…तर जीम मालकांवर कठोर कारवाई!
उपचारांसाठी आपण मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केल्या आहेत. आता रुग्ण कमी होण्यामुळे रुग्णशय्या रिकाम्या राहू लागल्या आहेत. त्या रिकाम्याच रहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, करोना प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष झाल्यास, आहे त्या सुविधांवरही अचानक ताण येऊ नये याची खबरदारी घ्यावी लागेल. कारण उपकरणे, सुविधा म्हणजे रुग्णशय्या, व्हेंटिलेटर्स, रुग्णवाहिका या यापूर्वीच आपण पुरेश्या संख्येने उपलब्ध केल्या आहेत. त्या आणखीही वाढविता येतील. पण त्यासाठी लागणारे डॉक्टर्स, परिचारिका असे चांगले मनुष्यबळ उभे करणे अवघड होते. त्यामुळे विषाणू संसर्ग आटोक्यात येतो आहे, असे दिसतानाच, संसर्ग वाढू नये यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण जीम, व्यायामशाळांसाठी ‘एसओपी’ तयार केली आहे आणि तिचे पालन होणे आवश्यक आहे. या ‘एसओपी’चे पालन करण्याची जबाबदारी जीम, व्यायामशाळा यांच्या मालकांवर आहे. या ‘एसओपी’चे काटेकोरपणे पालन न केल्यास, गलथानपणा आढळल्यास मात्र संबंधितावर कठोर कारवाई करणे भाग पडेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
वाचा:
या असतील अटी
आरोग्य विभाग, वैद्यकीय तज्ज्ञ आणि जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळांचे चालक यांनी तयार केलेल्या ‘एसओपी’चे पालन करूनच दसऱ्यापासून जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा सुरू करता येणार आहेत. हे नियम तपशीलाने आणि नेमकेपणाने तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यायामासाठी येणाऱ्या सदस्यांना या ‘एसओपी’ची पूर्णपणे माहिती देणे अपेक्षित आहे. व्यायाम शाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे. प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी तसेच स्वच्छतेच्या बाबी यासाठी तपशीलाने नियमावली तयार करण्यात आली आहे. व्यायामशाळेत प्रवेश करण्यापासून ते व्यायाम करताना कोण-कोणती काळजी घ्यावी याचे नियम आहेत. शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टी बरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारीरिक अंतर राखणे. व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे. उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे. दररोज रात्री जीम,व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.
बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, डॉ. शशांक जोशी तसेच महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे निखिल राजपुरीया आदी उपस्थित होते.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times