मुंबई- कोणत्याही देवीच्या मंदिरात गेलं, की मला प्रसन्न वाटतं. माझा देवावर विश्वास आहे, श्रद्धा आहे. त्यामुळे देवीच्या भूमिका करायला मिळाल्या, की फार आनंद होतो. खरं सांगायचं तर देवीची भूमिका करताना विशेष अशी काहीच तयारी मी करत नाही. सेटवर जाऊन देवीचा पेहराव परिधान केला की आपोआप एक प्रकारची पवित्र निर्मळ ऊर्जा जाणवते. देवीआई पाठीशी उभी राहते आणि सगळं काम व्यवस्थित होतं.

अंबाबाई मला विशेष जवळची वाटते. मी कधीही कोल्हापूरला गेले की अंबाबाईचं दर्शन घेतल्याशिवाय परत येत नाही. मंदिरात गेल्यावर एक सकारात्मक ऊर्जा मिळते. पूर्णपणे रिचार्ज झाल्यासारखं वाटतं. देवीच्याच कृपेनं आतापर्यंत अनेक वेळा देवीच्या भूमिका करण्याचा योग जुळून आला. मानवरुपी देव्या साकारायला मला जास्त आवडतं.

वीस वर्षांपूर्वी ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ या सिनेमात मी काळूबाई झाले होते आणि तेव्हापासून काळूबाईशी एक घट्ट नातं जोडलं गेलं. काळूबाई ही एक मराठमोळी देवी आहे. ती अगदी आपल्यातलीच एक वाटते. मनातलं सगळं तिला सांगावसं वाटतं आणि ती आपलं ऐकतेही. देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण काळूबाईच्या दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी देवी अशी काळूबाईची ख्याती आहे. सबंध पौष महिना गावात तिच्या उत्सवाची जत्रा असते. चित्रपट केला त्यावेळी पहिल्यांदा मी काळूबाईच्या देवळात गेले होते आणि तेव्हापासून नेमानं तिच्या दर्शनाला जाते.

भक्तांना आपलंसं करून घेणाऱ्या काळूबाईवर आपण एक मालिका करायची अशी माझी मनापासून इच्छा होती. आपण या मालिकेची निर्मिती करायची आणि त्यात कामही करायचं हे स्वप्न मी खूप आधी पाहिलं होतं. यंदा सर्व गोष्टींचा योग जुळून आला आणि ” ही मालिका आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणू शकलो. करोनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात शूटिंग करताना अनेक लहान-मोठ्या अडचणी येत असतात. अजून मंदिरं उघडलेली नाहीयत. अनेक प्रकारच्या परवानग्या हल्ली घ्याव्या लागत आहेत. पण या सगळ्यामध्ये काळूबाई आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.

तिनं आमची परीक्षा पाहिली, तरीही ती साथीला आहे हे पावलोपावली जाणवतं. देवीवर आधारित मालिका करताना काही बाबींची विशेष खबरदारी घ्यावी लागते. लोकांच्या भावना देवीशी जोडलेल्या असतात. कोणीही दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आमच्या मालिकेचे लेखक शिरीष लाटकर यांनी अतिशय उत्तम पद्धतीने आशयाची मांडणी केली आहे.

मालिकेत मी काळूबाईच्या भूमिकेत आहे. कितीतरी बायका शूटिंग सुरू असताना माझी वाट बघत थांबलेल्या असतात. वयस्कर बायका येऊन ओटी भरतात. मला नमस्कार करतात. त्यावेळी कुठेतरी थोडा संकोच वाटतो. मी माणूस आहे, मला देवत्व देऊ नका, असं त्यांना सांगावसं वाटतं. पण, त्यांचं वंदन हे काळूबाईला आहे, हे मी समजून घेते.

देवीचा पेहराव परिधान केल्यावर अत्यंत जबाबदारीने वागते. भेटायला आलेल्या प्रत्येकीची आवर्जून विचारपूस करते. मला असं वाटतं, माणुसकी हाच देवत्वाकडे जाणारा खरा मार्ग आहे. आपण आपली कर्म प्रामाणिकपणे करत राहायला हवीत. अडचणीत असलेल्या माणसाला मदत करायला हवी. परमेश्वर या सगळ्याची बरोबर नोंद ठेवत असतो.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी मुंबईला घरी जाणार आहे. आमच्या घरी घट बसतात. देवीची पूजा, आरती मी मनोभावे करते. करोनाच्या या भयंकर संकटातून सगळ्यांना मुक्त कर, असं मागणं मी यंदा देवीकडे मागणार आहे.

शब्दांकन – गौरी आंबेडकर, रुईया कॉलेज

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here