हैदराबाद: मुसळधार पावसामुळे शनिवारी हैदराबादच्या मोठ्या भागात पूरस्थिती निर्माण झाली. शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागात पावसाचं पाणी शिरलं आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी आणि सर्वत्र पाणी साचलं आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यांवर २ फूटांपेक्षा जास्त पाणी दिसत आहे. शहरात शनिवारी १५० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. मंगळवारीही हैदराबाद शहराला पावसाचा तडाखा बसला होता. मंगळवारी १९० मिमी पावसाची नोंद झाली होती. या पावसामुळे आतापर्यंत किमान ५० जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात असून हजारो कोटींचे नुकसान झालं आहे.

हैदराबाद महानगरपालिकेचे दक्षता आणि आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक विश्वजित कंपती यांनी एका ट्विटमध्ये पावसासंदर्भात माहिती दिली आहे. आपत्ती निवारण दल सतत तुंबलेलं पाणी हटवण्याचं काम करत आहे, असं ते म्हणाले. रविवारी शहराच्या काही भागात हलका ते मध्यम किंवा वादळी पावसाची शक्यता आहे. तर एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हैदराबादच्या हवामान विभागाने म्हटलं आहे.

अतिवृष्टीमुळे ५० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ९,००० कोटींचे नुकसान झाले आहे. पावसामुळे प्रभावित भागात अधिकारी मदतकार्य करत आहेत. काही भाग पाण्यात बुडाले आहेत, अशी माहिती मंगळवारच्या पावसाच्या तडाख्यानंतर गुरुवारी राज्य सरकारने दिली होती.

अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान आणि एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तेलंगणसह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकलाही पावसाचा फटका बसला आहे.

पूरग्रस्तांच्या कुटुंबाची ओळख पटवण्यात येईल आणि त्यांच्या घरी रेशन किट देण्यात येईल. प्रत्येक किटची किंमत ही २८०० रुपये आहे आणि त्यात एका महिन्याचं रेशन आणि तीन चादरींचा समावेश असेल, अशी माहिती तेलंगणाचे मंत्री के. टी. रामाराव यांनी शनिवारी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here