म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः देवीच्या दर्शनासाठी नेहमी दिसणाऱ्या रांगा, उत्साही भाविकांकडून होणारा अंबामातेचा जयघोष आणि दिवसभर ओसंडून वाहणारा उत्साह या सर्वांनाच फाटा देत शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. बंदीमुळे भाविकांअभावी परिसर दिवसभर सुनासुना दिसत होता. करवीर निवासिनी अंबाबाईची ‘महाशक्ती कुण्डलिनीस्वरुपा’रुपात पूजा बांधली.

शारदीय नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात दरवर्षी प्रचंड गर्दी होते. रोज लाखावर भाविक देवीचे दर्शन घेतात. यंदा मात्र मंदिर बंद असून परिसरात येण्यासही बंदी असल्याने भाविकांची गर्दी दिसली नाही. सकाळापासून मंदिराचा परिसर सुनासुना दिसत होता. काही भाविक भवानी चौकातून कळसाचे दर्शन घेत होते. देवीच्या ओटीचे साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांची दरवर्षी या परिसरात मोठी गर्दी असते. त्यांनाही बंदी घालण्यात आल्याने एकही विक्रेता तेथे नव्हता. सकाळी घटस्थापना आणि तोफेच्या सलामीने शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी सकाळी देवीची विधीवत पूजा झाली. मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमांची लगबग होती.

या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने देवीच्या दर्शनासाठी शहरात दहा ठिकाणी एलईडी स्क्रीनची व्यवस्था केली आहे. यंदाच्या नवरात्र उत्सवात, ‘श्री करवीर माहात्म्यातील स्तोत्रांमधून होणारे श्री करवीर निवासिनीचे दर्शन’ही संकल्पना आहे. शनिवारी अंबाबाईची पूजा ‘महाशक्ती कुण्डलिनीस्वरुपा’रुपात पूजा बांधली. ही पूजा श्रीपूजक माधव मुनिश्वर व मकरंद मुनिश्वर यांनी बांधली.

दरम्यान, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीत समितीने केलेल्या विविध तयारीचा आढावा घेतला. करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात गर्दी होऊ नये यासाठी ऑनलाइन दर्शनाची सोय केल्याचे त्यांनी सांगितले. देवीची महती विविध पन्नास भाषेत सांगणार असल्याचे सांगताना ते म्हणाले, मंदिरातील सर्व धार्मिक विधी नेहमीप्रमाणेच होतील. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या विधींचे दर्शन घरबसल्या घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here