मुंबई: मनावर घेतल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असं म्हणतात ते खरं आहे. जीआरपी पोलीस तुषार पाटील यांच्याबाबतीत काहीसं असंच घडलंय. बहिणीकडून सतत दिल्या जाणाऱ्या टोमण्यामुळे पाटील यांनी अवघ्या तीन वर्षात वजन घटवलं. पोटाचा वाढलेला घेर कमी केला आणि मॅरेथॉन स्पर्धेत भागही घेतला. आता येत्या १९ जानेवारी रोजी होणाऱ्या स्पर्धेतही पाटील भाग घेणार असून या स्पर्धेची ते जोमाने तयारी करत आहेत.

तुषार पाटील हे दादर रेल्वे पोलीस स्थानकात कार्यरत आहेत. मुळचे अलिबागच्या असलेले तुषार पाटील यांच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. पाटील यांना दोन मुलंही आहेत. पाटील हे लहानपणापासून खेळात निपूण होते. त्यांनी देशभर धावले आहेत. स्पर्धांमध्येही भाग घेतला आहे. तरुणपणी त्यांनी १ तास १२ मिनिटात २१.१ मीटरचं अंतरही पार केलेलं आहे. लग्न झाल्यावर नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या पाटील यांनी फिटनेसकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे वजन वाढलं. पोटाचा घेरही वाढला. २०१६मध्ये तर खुर्चीवर पाय ठेवूनच त्यांना मोजे घालावे लागत होते, इतकं त्यांचं वजन वाढलं होतं. त्यामुळे त्यांची बहीण सतत त्यांना टोमणे मारत होती आणि धावण्यास पुन्हा सुरुवात करण्यास सांगत होती.

त्यामुळे पाटील यांनी २०१६पासून पुन्हा एकदा धावण्याचा सराव करण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या नऊ महिन्यातच पाटील यांनी मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. पाटील यांनी या फुल मॅरेथॉनमध्ये ४.१ तासात ४२.२ किलोमीटरचं अंतर पार केलं. त्यानंतर २०१८मध्ये त्यांनी अवघ्या १२ तासांत ९६ किलोमीटरचं अंतर पार केलं. आता त्यांनी यावेळी हाफ मॅरेथॉनचीही तयारी सुरू केली आहे. तरुणपणातील फिटनेस पुन्हा राखण्यात यश आलं, याबद्दल मला समाधान आहे, असं पाटील म्हणाले. फिटनेस ठेवण्यासाठी वेळेचं नियोजन करणं ही त्यांच्यासाठी कसरत होती. त्यांची सध्याची ड्युटी दुपारी २ ते रात्री १० पर्यंतची आहे. त्यामुळे त्यांना सकाळीच धावण्याचा सराव करावा लागतो. पहाटे ६ ची ड्युटी असेल तेव्हा संध्याकाळी सायकलिंग करण्यावर त्यांचा भर असतो. फिटनेस राखण्यासाठी बाहेरचे पदार्थ खात नाही, घरचा टिफिन खाण्यावरच भर असतो, असं त्यांनी सांगितलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here