नवी दिल्लीः भारतात करोना समूह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला असल्याची कबुली केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी दिली. पण हा समूह संसर्ग केवळ काही जिल्हे आणि राज्यांपुरता मर्यादित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानानंतर त्यांनी ही माहिती दिली. राज्यात करोनाचा समूह संसर्ग सुरू झाल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

राज्यात समूह संसर्गाची प्रकरणं समोर आल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. यावरून इतर राज्यांमध्ये देखील समूह संसर्ग सुरू आहे का? असा प्रश्न हर्षवर्धन यांना केला गेला. ‘ ‘पश्चिम बंगालसह विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या भागात समूह संसर्ग प्रसार होण्याची शक्यता आहे. खास करून दाट लोकवस्तीत हा संसर्ग होण्याची शक्यता आहे. पण समूह संसर्ग हा संपूर्ण देशभरात नाहीए. हा फक्त मार्यादित राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्येच आहे’, असं हर्षवर्धन म्हणाले. वर्धन यांनी हे वक्तव्य त्यांच्या रविवारीच्या ‘रविवार संवाद’ वेबिनारमध्ये दिलं. साप्ताहिक वेबिनारमध्ये केंद्रीयमंत्री जनतेशी सोशल मीडियावर चर्चा करतात आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात.

करोना संसर्गाच्या प्रादुर्भावानंतर आरोग्यमंत्र्यांनी पहिल्यांदा समूह संसर्गाची कबुली दिली आहे. यापूर्वी त्यांनी नेहमी समूह संसर्गाचा इन्कार केला होता. या आठवड्याच्या सुरुवातीला ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या नागरिकांना दुर्गापूजा उत्सवात सतर्क राहण्याचं आवाहन केलं होतं. ‘सण-उत्सवाच्या काळात करोना रोखण्यासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. राज्यात करोनाच्या समूह संसर्गाची काही प्रकरणंही समोर आली आहेत’, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जुलैमध्ये एक मार्गदर्शन दस्तऐवज जारी केले होते. ज्यात एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात भारतात समूह संसर्ग सुरू झाल्याचे नकळतपणे उघड झालं होतं. हे दस्तऐवज नंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवरून काढण्यात आले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here