म. टा. प्रतिनिधी, सांगली: राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री यांना रविवारी एका सहका-याच्या अस्थी विसर्जनावेळी अश्रू आवरता आले नाहीत. जवळचे सहकारी आणि मित्रांच्या अकाली निधनामुळे त्यांना गहिवरून आले. करोना संसर्गाने जवळचे अनेक लोक दगावल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले. मिश्कील स्वभावाचे राजकारणी म्हणून ओळख असलेले मंत्री पाटील यांचे हळवे रूप यानिमित्ताने समोर आले.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम रविवारी सकाळी पार पडला. या कार्यक्रमाला मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. जगदीश पाटील यांच्या कार्याविषयी बोलताना अचानक जयंत पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला. काही काळासाठी ते स्तब्ध झाले. जवळच्या लोकांना श्रद्धांजली वाहण्याची आलेली वेळ त्यांच्या कातर स्वरातून स्पष्टपणे जाणवत होती. यावेळी जयंत पाटील म्हणाले, ‘लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी वैचारिक बांधिलकी असणारे अनेक लोक मला लाभले. या लोकांच्या ताकदीनेच आज मी इथपर्यंत आलो आहे. मात्र तेच लोक आज माझ्या हातून निसटत आहेत याचं दुःख होत आहे.

‘करोनामुळे जगभरात अनेक माणसं दगावली आहेत. भारतातही अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागला. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक जे. वाय. पाटील, राजारामबापू दूध संघाचे संचालक जगन्नाथ पाटील, अशोक पाटील, इस्लामपूर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील असे अनेक जवळचे लोक जयंत पाटील यांनी गमावले आहेत. मतदार संघात पोहोचताच दोन, तीन कार्यकर्ते, सहकारी, मित्रांच्या घरी सांत्वनासाठी जावे लागते. मित्र आणि कार्यकर्ते हीच संपत्ती मानणारे मंत्री पाटील यांना सहका-यांचे अकाली जाणे जिव्हारी लागत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here