नवी दिल्ली: सणासुदीच्या काळात करोना संदर्भात सतर्कता न बाळगल्यास आणि सूट दिल्यास महिन्याला २६ लाख नवीन करोना रूग्ण समोर येऊ शकतात, असा इशारा केंद्र सरकारच्या एका तज्ज्ञ समितीने दिला आहे. भारतात करोनाचा संसर्ग सर्वोच्च पातळी गाठून गेला आहे. आता रोज आढळून येणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे, यावरून समितीने हा दावा केला आहे.

करोनामुळे देशातील केवळ ३० टक्के नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. अशा परिस्थितीत येणारा हिवाळा आणि उत्सवांमध्ये कुठल्याही स्तरावरील निष्काळजी चिंता वाढवू शकते. करोना संदर्भात जारी केलेल्या सुरक्षा नियमांचे आणि मागर्दर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले गेले तर फेब्रुवारी २०२१ पर्यंत या देशात करोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल, असं समितीने म्हटलं आहे.

हिवाळ्यातील थंडीची चाहूल आणि आगामी सणांच्या हंगाम पाहता देशात करोना संसर्गाची नवी लाट येण्याचा धोका आहे. अशा स्थितीत कुठल्याही स्तरावर दुर्लक्ष करून चालणार नाही, अन्यथा अतिशय बिकट परिस्थिती उद्भवू शकते. करोनासंदर्भात जारी केलेले सुरक्षेचे प्रोटोकॉल आणि इतर निर्बंध पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवावेत, अशी शिफारस समितीने सरकारला केली आहे. येत्या फेब्रुवारीपर्यंत करोना संसर्ग नियंत्रणात आल्यास एकूण रूग्णांची संख्या सुमारे १ कोटी ५ लाखापर्यंत असेल. सध्या ही संख्या ७५ लाखांच्या जवळ आहे, असं समितीने म्हटलं आहे.

‘लॉकडाउन नसता तर मृतांची संख्या २५ लाखांवर’

देशात लॉकडाउन घोषित केला नसता तर ऑगस्टपर्यंत २५ लाख नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला असता. सध्या ही संख्या १ लाख १४ हजारांच्या जवळ आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा देशव्यापी लॉकडाउन करावा, याचे समर्थन समितीने केलेले नाही. एखाद्या विशिष्ट भागात संसर्ग वाढल्यास लॉकडाउनचा उपयोग करता येऊ शकतो, असं समितीने सुचवलं आहे.

केरळमधील ओणमदरम्यान वाढला संसर्ग

दरम्यान, सणांच्या काळात नागरिकांची गर्दी होते. केरळमध्ये २२ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान ओणम सणानंतर संसर्गात मोठी वाढ झाल्याचं समोर आलं होतं. संसर्ग होण्याची शक्यता ३२ टक्क्यांनी वाढली आहे. तर, प्रभावी उपचार मिळण्याची शक्यता २२ टक्क्यांनी कमी झाली आहे. आता येत्या दोन महिन्यांत दसरा आणि दीपावलीसारखे सण येत आहेत. यामुळे कुठल्याची प्रकारची अधिक सूट देणं धोकादायक ठरू शकतं, असं समितीने म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here