नवी दिल्ली: भारतीय लोकशाही सध्या सर्वात कठीण स्थितीतून जात आहे, असं म्हणत कॉंग्रेस अध्यक्ष केंद्रातील एनडीए सरकारवर हल्लाबोल केला. सोनिया गांधी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कृषी कायदे आणि दलितांवरील कथित अत्याचारांच्या मुद्द्यांवर देशव्यापी आंदोलन करण्याच्या रुपरेषेवर चर्चा झाली. कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी या बैठकीला उपस्थित होते. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. करोना संसर्ग, अर्थव्यवस्थेची बिकट स्थिती, तीन कृषी कायदे आणि दलितांवरील कथित अत्याचार प्रकरणं चुकीच्या पद्धतीने हाताळण्यावरून सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या बैठकीनंतर कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी माहिती दिली. केंद्रातील भाजपप्रणीत सरकारच्या शेतकरीविरोधी, महिलाविरोधी, गरीब आणि लोकविरोधी’ धोरणांच्या विरोधात आंदोलनांची मालिका सुरू करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असं वेणुगोपाल यांनी सांगितलं.

हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या न्यायासाठी ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती दिनी आंदोलन करणार आणि कृषी कायद्यांविरोधात इंदिरा गांधी यांच्या बलिदान दिनी ‘शेतकरी हक्क दिन आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी हक्क दिनी कृषी कायद्याच्या विरोधात कॉंग्रेस प्रत्येक जिल्हा मुख्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत ‘सत्याग्रह व उपोषण’ करेल. तर ५ नोव्हेंबरला ‘महिला आणि दलित अत्याचार दिन’ म्हणून आंदोलन करेल. यामध्ये प्रत्येक राज्य मुख्यालयात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत राज्यस्तरीय धरणे आंदोलन होणार आहे, अशी माहिती पक्षाने दिली आहे.

देशभरात दलितांवर सतत होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे खास करून हाथरसमधील पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर झालेल्या अत्याचार या आंदोलनातून मांडला जाणार आहे. यावर्षी १४ ला नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जयंतीच्या दिवशी दिवाळी येत आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या एकदिवस आधी म्हणजे १३ नोव्हेंबरला ‘नेहरूंची विचारधारा आणि देशाचा विकास’ या विषयावर प्रत्येक राज्य मुख्यालयात चर्चासत्राचे आयोजन केले जाईल. नेहरूंद्वारे निर्मित ‘स्वावलंबी भारत’ या थीमवर ‘स्पीक अप फॉर पीएसयू’ या विषयावर १४ नोव्हेंबरला ऑनलाइन मोहीम राबवली जाईल, असाही बैठकीत निर्णय घेण्यात आला.

हरितक्रांतीतून शेतकऱ्यांना मिळालेले फायदे संपवण्याचं षडयंत्र रचल गेलं आहे. कोट्यवधी शेतमजूर, शेती-शेती करणारे, भाडेकरू, लहान आणि मर्यादित शेतकरी, छोट्या दुकानदारांच्या रोजीरोटीवर हल्ला झाला आहे. हे षडयंत्र मिळून हाणून पाडणं आपलं कर्तव्य आहे, असं सोनिया गांधी या बैठकीत म्हणाल्या.

राज्यघटना आणि लोकशाही परंपरेवर जाणीवपूर्वक हल्ला होत असल्याचा आरोप गांधींनी केला. देशातील नागरिकांचे हक्क मूठभर भांडवलदारांच्या हाती हे सरकार सोपवू इच्छित आहे. करोना संकटाच्या काळात स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले. फक्त तेच नाहीत तर संपूर्ण देश संसर्गाच्या आगीत लोटला गेला. नियोजनाअभावी लाखो मजूर, कामगारांचं स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं स्थलांतर आम्ही पाहिलं आणि हे सरकार त्यांच्या दुर्दशेवर मुग गिळून बसलं होता, असा घणाघात सोनिया गांधी यांनी केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here