म. टा. प्रतिनिधी, : आनंदनगर येथील टेकडीच्या पायथ्याला मैत्रीणीसोबत थांबलेल्या तरुणाला कोयत्याच्या धाकाने लुटल्याची घटना शनिवारी भरदुपारी घडली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश चंद्रकांत वर्मा (वय २०, रा. सहवास कॉर्नर, कर्वेनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा शुक्रवारी दुपारी त्याच्या मैत्रीणीसोबत आनंदनगरच्या पाठीमागील तळजाई टेकडीच्या पायथ्याला गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला. त्याने वर्मा व त्याच्यासोबत असलेल्या तरुणीला धमकाविण्यास सुरुवात केली. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून दोघांकडील मोबाइल, त्यांची दुचाकी, एटीएम कार्ड असा साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. तरुणाने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण मिळते का याचा शोध पोलिस घेत आहेत.

एका महिन्यापूर्वी तळजाई टेकडीवर भरदुपारी तरुण व त्याच्या मैत्रिणीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना लुटल्याची घटना घडली होती. यामध्ये चोरट्याने दोघांना काचेच्या बाटलीने मारहाण केली होती. या प्रकरणीदेखील सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अद्यापपर्यंत आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे भरदुपारी तळजाई टेकडी व परिसरात फिरणे धोकादायक झाले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here