उस्मानाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वादग्रस्त भाषेत लिहिलेल्या पत्रावरून केंद्रीय गृहमंत्री यांनी राज्यपाल यांची कानउघडणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी कोश्यारींना टोला हाणला आहे. ‘स्वाभिमान असेल तर कोश्यारी यांनी पदावर राहायचं की नाही याचा विचार करावा,’ असं पवारांनी म्हटलं आहे.

मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून कोश्यारी यांनी अलीकडेच मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसेच, तुम्ही अचानक सेक्युलर कसे झालात, अशी विचारणाही केली होती. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही राज्यपालांच्या भाषेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अलीकडेच यावर भाष्य करताना, कोश्यारी यांनी ही भाषा टाळायला हवी होती, असं म्हटलं होतं.

वाचा:

याबद्दल तुळजापूर येथील पत्रकार परिषदेत पवारांना विचारण्यात आलं असता त्यांनी कोश्यारी यांच्या भूमिकेचा समाचार घेतला. ‘१९५७ पासून मी महाराष्ट्राचे राज्यपाल पाहिलेत. इतकंच नाही तर १९६७ नंतरच्या प्रत्येक राज्यपालांशी माझा संबंधही आला. मात्र, अशी भूमिका कुणी कधी घेतली नव्हती. राज्यपाल पद हे देशातील अत्यंत महत्त्वाचं पद आहे. त्याची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाचीही प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. तसं झालं नाही तर अस्वस्थता पसरणे स्वाभाविक आहे,’ असं पवार म्हणाले. ‘देशाच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणात राज्यपालांची कानउघडणी केली ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट आहे. गृहमंत्र्यांनी जाहीरपणे फटकारल्यानंतर स्वाभिमान असेल तर कोश्यारी यांनी या पदावर राहायचं की नाही हा विचार करावा, असंही पवार म्हणाले. ‘गृहमंत्र्यांनी जाहीरपणे टीकाटिप्पणी केल्यानंतरही ते तिथं बसणार असतील तर ठीक आहे. ‘शहाण्याला शब्दांचा मार’ अशी एक म्हण आपल्याकडं आहे. मात्र, यातील तो शब्द इथे लागू होतो का हे माहीत नाही,’ असा टोला पवारांनी हाणला. शरद पवार यांनी यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here