मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. अलीकडे त्यांनी राज्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरक्षणाच्या संदर्भातही भूमिका मांडली होती. ‘कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. आम्ही अजूनही संयम राखला आहे, पण गरज पडेल त्यावेळी तलवारी काढू, असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता. त्याचवेळी, गरज पडल्यास घटना बदलण्याच्या दृष्टीनंही अभ्यास सुरू आहे, असं संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजे यांनी घटना बदलाबद्दल केलेले हे वक्तव्य सर्वत्र प्रसिद्ध झाले आणि उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर आज फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे.
वाचा:
‘आत्ताच मी पूरग्रस्त भागाची पाहणी करून मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो, तेव्हा मला माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलेल्या बातम्या दिसल्या. त्यात घटनाबदला संदर्भातील वाक्य आहे. खरंतर मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी घटना दुरुस्ती करण्यासंबंधी अभ्यास करणार आहे, असं मला म्हणायचं होतं. चुकून बोलण्याच्या ओघात, घटना ‘दुरुस्ती’ ऐवजी ‘बदल’ हा शब्द निघाला असावा,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘पत्रकारांनी माझी मूळ भावना समजून न घेता, चुकीच्या पद्धतीनं बातम्या लावल्या. त्यामुळं लोकांच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो,’ असंही ते म्हणाले.
‘मराठा आरक्षणा बाबत संसदेत घटनादुरुस्ती हाही पर्याय होऊ शकतो असे विद्वान सांगत आहेत आणि मी त्याचा अभ्यास करून पावले उचलणार आहे,’ याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times