म.टा. प्रतिनिधी, नगरः यावेळी बिहारच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे मुद्दे गाजत असतानाच सर्वच पक्षांनी राज्यातून बिहारमध्ये पदाधिकारी-कार्यकर्ते पाठविण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसनेही बिहार निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून राज्यातील काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना २० ऑक्टोबर रोजी बिहारमध्ये दाखल होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बिहार निवडणुकीसाठी भाजपकडून सर्वांत प्रथम महाराष्ट्राचा सहभाग देण्यात आला. विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तेथे पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण, मुंबई पोलिस यासह महाराष्ट्रातील इतर विषय बिहारच्या निवडणुकीत चर्चेत आले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने तेथे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातून त्यांचे स्टार प्रचारक आणि पदाधिकारी तेथे जाणार आहेत.
आता काँग्रेसनेही महाराष्ट्रातून पदाधिकारी बिहारला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस तेथे अन्य पक्षांशी युती करून निवडणूक लढवित आहे. देश पातळीवरील आणि अन्य राज्यातील नेतेमंडळी तेथे जाणार आहेत. पण यावेळी महाराष्टातूनही पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे. काँग्रेसच्या निवडणूक निरीक्षकांमध्ये महाराष्ट्रातील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख (नगर), नामदेव उसेंडी (गडचिरोली), राजाराम पानगव्हाणे (नाशिक), सुनील शिंदे (पुणे) यांचीही बिहारमधील विविध जिल्ह्यांत निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांनी बिहारमधील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात २० ऑक्टोबरला हजर व्हावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व बिहार निवडणुकीचे प्रचार प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. बिहार निवडणुकीच्या प्रचारात यावेळी प्रथमच महाराष्ट्राला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपली फौज तिकडे पाठविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे तेथील प्रचारात महाराष्ट्रासंबंधीचे मुद्दे उपस्थित झाल्यास त्यावर वाद-प्रतिवाद होणार आहे. या निवडणुकीतील प्रचाराची पद्धत पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळी असल्याने पक्षीय कामाच्या अनुभवासोबतच तंत्रज्ञानाची माहिती असलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना बिहारला पाठविण्यावर भर देण्यात येत असल्याचे दिसून येते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here