तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस-पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेकडो घरांचे नुकसान झाले असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी बाधित व्यक्तींना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
हैदराबादमध्ये गेल्या १०० वर्षात इतका मुसळधार पाऊस पडलेला नाही. सखल भागातील सर्व बाधित गरीब कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव केलीय.
पावसात पूर्णपणे नुकसान झालेल्या झालेल्या सर्व घरांना १ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर अंशतः नुकसान झालेल्या घरांना ५०,००० रुपयांची मदत दिली जाईल, असं मुख्यमंत्री राव म्हणाले.
हवामान खात्याचा इशारा
तेलंगणात आणकी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तेलंगणाच्या बहुतेक भागात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेलंगणात २२ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
गेल्या आठवड्यापासून हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे. महानगरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली आहे. त्याचबरोबर मुसळधार पावसाने शहरात अनेक भागांमध्ये नागरिक अडकून पडले आहेत. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times