देशातील करोना रुग्णांची संख्येत रोज घट होत आहे आणि त्याच्या वाढीचे प्रमाणही कमी झालं आहे. भारतात करोनातून बरे होण्याचे प्रमाणही ८८ टक्क्यांपर्यंत गेले आहे. हे शक्य झालं कारण लॉकडाउन घोषित करणारा भारत पहिला देश होता. तसंच नागरिकांना मास्क वापरण्यास प्रोत्साहित करणारा पहिला देश होता. संसर्ग शोधण्यासाठी भारताने प्रभावीपणे काम केलं आणि जलद स्क्रीनिंग करणार्या पहिल्या देशांपैकी एक होता, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
आपल्याला इथंच थांबून चालणार नाही. आम्ही लस वितरण प्रणालीदेखील विकसित करत आहोत. स्वच्छता वाढवणं आणि स्वच्छतागृहांची संख्या वाढवण्यासह अनेक प्रयत्न केले. चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असं मोदींनी सांगितलं.
विज्ञान आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रामध्ये नियोजित गुंतवणूक करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. जगाचं भवितव्य या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणारा समाज निश्चित करेल. पण त्यात सहकार्य आणि लोकसहभागाची मोठी भूमिका असेल. विज्ञान आणि नाविन्य विचारात गुंतवणूक करणारा समाजाच जगाचे भविष्य निश्चित करेल, असं मोदी म्हणाले.
गुंतवणूक नियोजित आणि दूरदृष्टी ठेवून केली पाहिजे. विज्ञान आणि नाविन्यात गुंतवणूक ही प्राधान्य स्तरावर करायला हवी. यामुळे त्याचा योग्य वेळी फायदा घेता येईल. सहकार्य आणि लोकसहभागातून नवनिर्मितीचा प्रवास निश्चित केला गेला पाहिजे. कारण आखलेल्या रेषेच्या मर्यादेत विज्ञानाची कधीही प्रगती होऊ शकत नाही, असं मोदींनी स्पष्ट केलं.
आरोग्य आणि विकासाच्या क्षेत्रातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नाविन्यपूर्ण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी ‘ग्रँड चॅलेंजेस’ गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत आहे. १९ ते २१ ऑक्टोबर दरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक भागीदारी अधिक सखोल करण्यासाठी एका व्यासपीठावर जगातील आघाडीचे वैज्ञानिक आणि धोरणकर्ते एकत्र आणण्याचं या मागचं उद्दीष्ट आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात नेत्यांचे संबोधन, पॅनेल चर्चा आणि साथीच्या रोगांवर प्रतिबंध करण्यासाठी लढा देण्यात शास्त्रज्ञांची दखल, साथीच्या आजाराचे व्यवस्थापन आणि साथीचा रोग आणि आगामी संभाव्य साथीच्या रोगाशी लढा देण्यासाठी जागतिक उपाययोजनांच्या अंमलबजावणी व विकासासह विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा यांचा समावेश आहे. या वार्षिक सभेला सुमारे ४० देशांतील १६०० प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. २०१२ मध्ये भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभाग आणि बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या सहकार्याने ‘ग्रँड चॅलेंजेस’ इंडियाची स्थापना झाली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times