म.टा. प्रतिनिधी, नगर: ‘, मराठवाड्यासोबतच नगर जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. असे असले तरी मंत्री आणि नेते त्या भागात गेले पण नगरला पालकमंत्रीही फिरकले नाहीत. नगर जिल्ह्यात शेतकरी नाहीत काय?’ असा सवाल शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

अतिवृष्टीग्रस्त भागात सध्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक नेत्यांचे दौरे सुरू आहेत. नगर जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याकडे लक्ष वेधताना दहातोंडे यांनी म्हटले आहे की, ‘अतिवृष्टीने लाखो शेतकऱ्यांना उद्वस्त केले आहे. आधी दुष्काळाने छळले, यंदा ओल्या दुष्काळाने मारले आहे. असे असताना वेगाने पंचनामे होत नाहीत. नगर जिल्ह्यात शेतकरी नाहीत का? येथील शेतकऱ्यांचे आश्रु सरकारमधील लोक, पालकमंत्री कधी पुसणार? सर्वच शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे., त्यामुळे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी.’

नगर जिल्ह्याबद्दल त्यांनी म्हटले आहे, ‘जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून सातत पाऊस पडत आहे. त्यामुळे खरिपातील बाजरी सोयाबीन तूर भुईमूग यासह फळपिके आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात शेवगाव, पाथर्डी, कर्जत सह दक्षिण जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी अक्षरश: उद्धवस्त झाले आहेत. नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अनेक भागात अतिवृष्टी म्हणजेच ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला नसल्याचे सांगत पंचनामे केले जात नसल्याचे आढळून आले. राज्यातील विविध भागांमध्ये राजकीय नेते पदाधिकारी पावसाने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. असे असताना नगर जिल्ह्यात मात्र राजकीय नेत्यांकडून दुर्लक्ष होत आहे. पालकमंत्री अजूनही कोणत्याही शेतकऱ्यांच्या दारात नाहीत. जिल्हा प्रशासन तसेच शासनाने तातडीने झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी, अन्यथ, शेतकरी मराठा महासंघातर्फे आंदोलन करण्यात येईल,’ अशा इशाराही दहतोंडे यांनी दिला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here