म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेच्या कामात अडथळे आणणाऱ्या लोकप्रतिनिधींची गय केली जाणार नाही,’ असा खरमरीत इशारा खासदार यांनी सोमवारी दिला. या योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंपनीवर कारवाईच्या सूचनाही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

पुणे महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी २४ तास समान पाणीपुरवठा योजनेला गती देण्याच्या उद्देशाने बापट यांनी पालिकेत प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर बापट पत्रकारांशी बोलत होते.

समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत टाक्यांची उभारणी, जलवाहिनी टाकण्याच्या कामात काही नगरसेवकांकडून खोडा घातला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्याबाबत विचारणा केली असता, ‘जे लोकप्रतिनिधी या कामात अडथळा आणतील, त्यांची गय केली जाणार नाही,’ असा सज्जड दम बापट यांनी दिला. या योजनेत ८४ ठिकाणी साठवण टाक्या उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी ३६ टक्के काम पूर्ण झाले आहे. १६७० किमी लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. पैकी ३०० किमी लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. पाण्याचे मीटर बसविण्याचे काम आठ टक्के पूर्ण झाले आहे. संथगती कामासाठी जागेच्या अडचणी, कायदेशीर मुद्दे, जुन्या टाक्या पाडण्याची कार्यवाही, मीटरबाबत प्रबोधनाचा अभाव कारणीभूत असल्याचे बापट यांनी सांगितले.

‘कामांसाठी टीमवर्कची गरज’

‘महापालिकेत विविध विकासकामे सुरू असून, काही कामांची गती खुंटली आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने त्यांना चालना देण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी, पीएमपी, घनकचरा व्यवस्थापन, चोवीस तास पाणीपुरवठा योजना आदी कामांमध्य़े मी लक्ष घालणार आहे. एकाने पुढाकार घेऊन प्रश्न सुटत नाहीत; तर सर्वांना सोबत घेऊन ‘टीमवर्क’ने काम केल्यावरच प्रश्न सुटतात,’ असेही बापट म्हणाले.

”महापालिका निवडणुकीवेळी जनतेला दिलेली सर्व आश्वासने आणि जाहीरनाम्यातील घोषणा पुढील वर्षभरात पूर्ण केल्या जातील. पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडेही पाठपुरावा करू” – गिरीश बापट, खासदार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here