मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्यापुढे नमते घेणाऱ्या भाजपवर शिवसेनेने टीकेची तोफ डागली आहे. भाजपला जास्त जागा मिळाल्या तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील असे म्हणणाऱ्या भाजपने बिहारचे हेच सूत्र महाराष्ट्रात का वापरले नाही?,’ असा सवाल करत शिवसेनेने भाजपला पुन्हा एकदा डिवचले आहे.

बिहारमध्ये निवडणूक प्रचाराने सध्या वेग घेतला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. बिहारमधील एका मंत्र्याने हैदराबादच्या रस्त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून तो बिहारमधील मुझफ्फरपूरचा असल्याचा दावा केला आहे. त्यावरून शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून बिहारमधील विकास, त्या विकासाचा चेहरा आणि भाजपच्या राजकारणावर भाष्य केलं आहे.

वाचा:

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपमध्ये सत्तेच्या समान वाटपाचे सूत्र ठरले होते. मात्र, निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा मतभेद झाले. समसमान वाटपात मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा नव्हता अशी भूमिका भाजपने घेतली. त्यामुळं संतापलेल्या शिवसेनेनं भाजपला धक्का देत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. बिहारमध्ये मात्र भाजपनं नितीशकुमारांना आधीच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करून टाकलं आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या भूमिकेचा शिवसेनेनं समाचार घेतला आहे. ‘नितीशबाबू हा एकच चेहरा बिहारात आहे, असे सगळ्यांनी ठरवूनच टाकले आहे. पण बिहारचे हे सूत्र भाजपने महाराष्ट्र किंवा इतरत्र वापरले नाही. नितीशकुमार ‘एनडीए’त जाऊन येऊन राहिले. तरी ते निष्ठावान, जुने सहकारी ठरतात. त्याबद्दल नितीशकुमारांच्या कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. कसे काय जमते बुवा यांना हे सगळे? ते रहस्यच आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा:

‘बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार हा खरोखरच विकासाचा चेहरा आहे काय? याचे उत्तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील नगरविकास आणि गृहनिर्माणमंत्री सुरेश कुमार शर्मा यांनी दिल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. ‘शर्मा यांनी ‘स्वत:चे कार्य’ म्हणून टाकलेला हैदराबादमधील रस्त्याचा फोटो हाच बिहारच्या विकासाचा खरा चेहरा आहे. नोकरीसाठी बिहारचे मजूर महाराष्ट्रात आणि प्रचारासाठी हैदराबादचे झगमगीत रस्ते बिहारात, अशी स्थिती आहे. बिहारमधील श्रमिकांना त्यांच्याच राज्यात काम मिळाले असते तर हैदराबादच्या रस्त्यांचे झगमगणारे फोटो ‘आपलेच’ म्हणून ढोल पिटण्याची नामुष्की आली नसती. सुशांतसिंह राजपूतच्या नावावर मते मागणे सुरूच आहे व आता इतर राज्यांतील विकासकामे स्वतःच्या नावावर खपविण्याचे भुरटे-भामटे उद्योगही नव्या दमाने सुरू झाले आहेत, असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here