सांगली: महिन्यापूर्वीच करोनाबाधितांच्या उपचारासाठी खाटांची उपलब्धता नसलेल्या जिल्ह्यात झपाट्याने रुग्णसंख्या कमी होत आहे. अनेक आणि खासगी रुग्णालये रिकामी पडत आहेत. जिल्ह्यात १२ कोव्हिड सेंटरमध्ये सध्या एकही रुग्ण नाही, तर २९ रुग्णालयांमध्ये १० पेक्षा कमी रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने पाच कोव्हिड रुग्णालयांनी उपचारातून मुक्त होण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे अर्ज केले आहेत.

करोनाच्या संसर्गामुळे सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांवर कमालीचा ताण आला होता. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरअभावी रुग्ण दगावण्याचा टक्का इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सांगलीत खुपच वाढला होता. गंभीर रुग्णांनाही रुग्णालयात खाटा मिळाल्या नाहीत. काही रुग्णांना तर दिवसभर रुग्णालयांपर्यंत हेलपाटे मारून उपचाराविना प्राण सोडावे लागले. खाटांची उपलब्धता नसल्याने सात हजारांहून अधिक रुग्णांना घरातच उपचार घ्यावे लागले. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात सांगलीतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे खुद्द पालकमंत्र्यांनीच कबूल केले होते. यानंतर सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. गेल्या चार दिवसांपासून रुग्णवाढीचा दर १५ ते २० टक्क्यांपर्यंत खाली आल्याने आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात सरकारी आणि खासगी अशा एकूण ६२ रुग्णालयांमध्ये करोनाबाधितांवर उपचाराची सोय केली आहे. यापैकी १२ रुग्णालयांमध्ये सध्या एकही रुग्ण नाही. २९ रुग्णालयांमध्ये दहापेक्षा कमी रुग्ण आहेत. १९ रुग्णालयांत ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत, तर केवळ तीन रुग्णालयात ५० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. मिरजेच्या शासकीय मेडिकल कॉलेज कोव्हिड सेंटरमध्ये १८२, सांगलीतील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ७३, तर वॉनलेस हॉस्पिटलमध्ये ५१ रुग्ण दाखल आहेत. उर्वरित कोव्हिड सेंटर आणि अधिगृहित केलेल्या खासगी रुग्णालयांमधील खाटा रिकाम्या आहेत. एकही रुग्ण नसलेल्या १२ रुग्णालयांपैकी ५ रुग्णालयांनी उपचार सेंटर बंद करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे अर्ज पाठवले आहेत. मात्र, दिवाळीनंतर पुन्हा करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने सध्याची सर्व करोना रुग्णालये सुरूच ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिका-यांनी घेतला आहे.

रुग्णालयांपेक्षा घरातच उपचार घेण्यास पसंती

सांगली जिल्ह्यात सध्या २५६७ रुग्ण आहेत. यापैकी १७९६ रुग्ण घरातच थांबून उपचार घेत आहेत, तर ७७१ रुग्ण रुग्णालयांमध्ये आहेत. रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यापेक्षा घरात थांबून उपचार घेण्याकडे कल वाढला आहे. यामुळे रुग्णालयांवरील ताण हलका झाला आहे. झपाट्याने रग्णसंख्या कमी होत असल्याने करोनामुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.

जिल्ह्यातील रुग्णसंख्या

जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित – ४३०७३

करोनामुक्त झालेले – ३८९०२

आजपर्यंतचे एकूण मृत्यू – १५८०

सध्याचे रुग्ण – २५६७

घरात थांबून उपचार घेणारे – १७९६

रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे – ७७१

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here