मुंबईः महिलांच्या रखडलेल्या लोकल प्रवासाला अखेर रेल्वेकडून परवानगी देण्यात आली आहे. उद्यापासून सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

नवरात्रीच्या मुहूर्तावर मुंबईत महिलांसाठी विशेष लोकल सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. राज्य सरकारने १६ ऑक्टोबरला तसे पत्रही रेल्वे प्रशासनाला लिहिले. मात्र, त्यानंतर अचानक रेल्वे प्रशासनानं घूमजाव करत गाड्या सुरू करता येणार नसल्याचे सांगितले. राज्य सरकारने आज पुन्हा पत्र पाठवत गाड्या सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनानं केली होती. राज्य सरकारने केलेल्या विनंतीवरून रेल्वेनं उद्यापासून महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सात वाजेपासून पुढे शेवटच्या लोकलपर्यंत महिला प्रवासी प्रवास करू शकतात. वैध तिकिटासह महिला प्रवासी करु शकणार आहेत यासाठी क्यू-आर कोडची आवश्यकता भासणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

सध्या मध्य रेल्वेवर सोमवारपासून एकूण ७०६ लोकल फेऱ्या सुरू झाल्या आहेत. पश्चिम रेल्वेवर या पूर्वीच ७०० लोकल धावत आहेत. या लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा आहे.

दरम्यान, राज्य सरकारने घटस्थापनेच्या मुहूर्तावरच सुरु करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली होती. मात्र, राज्य सरकारच्या या प्रस्तावावर रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी मिळाली नव्हती. तसंच, गर्दी नियंत्रणासाठी मानक कार्यपद्धती निश्चित कराव्यात. तसेच या उपाययोजना रेल्वे प्रशासनाला देखील कळवण्यात याव्यात, अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिवांना दिल्या होत्या. त्यावर आज राज्याचे मुख्य सचिव यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून लोकलसंदर्भात पुन्हा मागणी केली होती. यावर रेल्वे मंत्री पियुष गोयलं यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महिलांच्या रेल्वे प्रवासाला अखेर हिरवा कंदिल दाखवला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here