मुख्यमंत्री येडियुरप्पा केवळ आपल्या शिवमोगा जिल्ह्याच्या विकास कामात गुंतले आहेत. इतर विधानसभा मतदारसंघांसाठी दिलेला विकास निधीही त्यांनी परत घेतला आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्र्यांनी केला.
विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी १२५ कोटींचा निधी होता. पण मुख्यमंत्र्यांनी तो मागे घेतला. त्यानंतर आमच्यात वाद सुरू झाला. ते फक्त आपल्या शिवमोगाचा विकास करण्यात व्यग्र आहेत. ते आता जास्त काळ (मुख्यमंत्री) राहणार नाही. आता त्यांची जाण्याची वेळ आली आहे, असं यतनाल म्हणाले.
येडियुरप्पा यांच्याशिवाय भाजप नेतृत्वाकडे अनेक पर्याय आहेत. उमेश कट्टी (भाजपचे आमदार) यांनीही येडियुरप्पांना सवाल केला होता. ते शिवमोगाचे मुख्यमंत्री आहेत की संपूर्ण कर्नाटकचे? असा सवालही केला. आपल्या मतदारसंघासाठी घोषित केलेले १२५ कोटी रुपयांचा निधीतून आम्ही सर्व रस्ते सिमेंटचे तयार करण्याची योजना आखली होती. पण ही रक्कम काढून घेण्यात आली. पण आम्ही मागे हटणार नाही. आपण यासाठी लढणार आणि हा निधी परत आणणार, असा इशारा यतनाल यांनी दिला आहे.
उत्तर कर्नाटकातील जनतेच्या पाठिंब्याने भाजपची सत्ता आली आहे. मांड्या, चामराजनगर आणि कोलार या दक्षिणेतील जिल्ह्यांमधून भाजपला मत मिळालेलं नाही. भाजपमधील ७५ टक्के आमदार हे उत्तर कर्नाटकमधील आहेत. भाजप नेतृत्वाने हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. येडियुरप्पा यांचा उत्तराधिकारी हा उत्तर कर्नाटकातील असावा असा विचार पंतप्रधानांनी केला आहे. यामुळे येडियुरप्पा यांच्यानंतर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री हे उत्तर कर्नाटकातील असतील. हा निर्णय जवळपास झाला आहे, असं यतनाल म्हणाले.
येडियुरप्पा यांचं वय लक्षात घेता, अलिकडच्या काळात नेतृत्व बदलाचे काही कयास लावले जात आहेत. मात्र, येडियुरप्पांना हटवणार असल्याचा दावा कर्नाटक भाजपाने फेटाळून लावलं आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना यतनाल यांच्या नाराजीबद्दल विचारलं गेलं. आपण त्यांच्याशी बोलू, असं येडियुरप्पा म्हणाले. तर यतनाल यांचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कतील यांनी फेटाळून लावला आहे. राज्यात पक्षाचे नेतृत्व किंवा मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच नाही. येडियुरप्पा हे पुढील तीन वर्षे आमचे मुख्यमंत्री राहतील, असं नलिनकुमार म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times