म. टा. प्रतिनिधी, सांगलीः अनैतिक संबंधाचे बिंग फुटण्याच्या भीतीने अल्‍पवयीन मुलाचा खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झाली. अरुण शिवाजी माळी (वय ३३, रा. कवलापूर, ता. मिरज) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी मंगळवारी ही शिक्षा सुनावली. खुनाचा गुन्हा जुलै २०१५ मध्ये घडला होता.

सरकारी वकील मकरंद ग्रामोपाध्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, कवलापूर येथील करण अनिल खेडकर हा १७ वर्षीय मुलगा २१ जुलै २०१५ रोजी बेपत्ता झाला होता. याबाबतची तक्रार त्याच्या आईने संजय नगर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. दुसऱ्या दिवशीच शिराळा येथे मोरणा नदीच्या पात्रात एका पोत्यातून टाकलेला मृतदेह आढळला. मृतदेहासोबत शाळेची पुस्तके आणि जेवणाचा डबा होता. पुस्तकांवरील नावावरून हा मृतदेह करण खेडकर याचा असल्याचे निदर्शनास आले. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना मयत करण खेडकर आणि आरोपी अरुण माळी हे दोघे गुन्ह्यापूर्वी कवलापूर येथे एकत्र दिसल्याची माहिती मिळाली. यावरून माळी याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मयत करण खेडकर याच्या घराच्या शेजारीच राहणाऱ्या एका महिलेसोबत आरोपी अरुण माळी याचे होते. याची माहिती करणला मिळाली होती. करणमुळे आपले अनैतिक संबंधांचे बिंग फुटेल, या भीतीने आरोपी माळी याने त्याला मारण्याचा कट रचला.

सायकलवरून शाळेत जाणाऱ्या करणला आरोपी माळी हा गोड बोलून गावातील तालमीत घेऊन गेला. त्या ठिकाणी करणच्या डोक्यात बांबू मारून त्याला जखमी केले. यानंतर गळा आवळून त्याचा खून केला. करणचा मृतदेह एका पोत्यात घालून त्याची पुस्तके, जेवणाचा डबाही त्यात ठेवला. एका मित्राच्या कारमधून मृतदेहाचे पोते शिराळा येथील मोरणा नदीच्या पात्रात फेकले. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक ए. व्ही. शिंदे यांनी तपास करून कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात कोर्टात २१ साक्षी नोंदविण्यात आल्या. साक्षीदारांच्या साक्षी, उपलब्ध पुरावे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अरुण माळी याला कोर्टाने दोषी ठरवले. कलम ३०२ नुसार त्याला जन्मठेप आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, तर कलम २०१ नुसार तीन वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here