म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: आत्याच्या आजारी नवऱ्याला दारूच्या नशेत तरुणाने जिवंत जाळल्याचा प्रकार मंगळवारी (२० ऑक्टोबर) पहाटे जाधव चाळ, दाभाडे येथे घडला.

विजयसिंग भगवानसिंग जव्हेरी (वय ५५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मीना विजयसिंग जव्हेरी (वय ४७, रा. जाधव चाळ) यांनी याबाबत मंगळवारी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नारायणसिंग विजयसिंग जव्हेरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीना यांचा मुलगा त्याच्या पत्नी आणि मुलासोबत इंदूरला राहतो. मीना यांचे पती विजयसिंग यांचे वीस वर्षांपूर्वी ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाले. मागील काही महिन्यांपासून ते अंथरुणाला खिळून होते. मीना यांच्या पंढरपूर येथील लहान भावाचा मुलगा नारायणसिंग दारू पिऊन त्रास देत असे. त्यामुळे त्यांचा भाऊ त्याच्या कुटुंबासह मीना यांच्या घराजवळील खोलीत गेल्या १५ दिवसांपासून राहायला आला. तेथेही नारायणसिंग दारू पिऊन भांडणे करत असे.

नारायणसिंगने सोमवारी दिवसभर दारू पिऊन घरच्यांसोबत भांडण केले. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास तो मीना यांच्या घरात आला. ‘तू मला घरात घे, नाही तर मी तुला दगडाने मारून टाकीन. मला सोफ्यावर झोपू दे, नाही तर तुझ्या नवऱ्यालाही मारून टाकीन,’ अशी धमकी त्याने दिली. मीना यांच्या घर मालकिणीचा मुलगा प्रसाद जाधव नारायणसिंगला समजवण्यासाठी आला. मात्र, तो कुणाचेही ऐकत नव्हता. त्यामुळे मीना यांनी नारायणसिंगला घरातच कोंडले.

पहाटे चारच्या सुमारास मीना यांनी पोलिसांना हा प्रकार सांगितला. पोलिस त्यांच्यासोबत घरी गेले. त्या वेळी घरातून धूर निघत होता. घरात मीना यांचे पती विजयसिंग यांना आगीने घेरले होते. आरोपीने विजयसिंग यांना पेटवून त्यांचा खून केल्याचे समोर आले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here