एकनाथ खडसेंनी भाजपच्या सर्व पदांसह सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फडणवीसांवर टिकास्त्र सोडलं होतं. माझा आजहील भाजपवर रोष नाही, पण मला फडणवीसांनी छळले, मी त्यांच्यावर नाराज आहे. माझ्यावर झालेल्या आरोपामुळं व मानसिक छळामुळं मी पक्षांतराचा निर्णय घेतला आहे, असा घणाघाती आरोप केला होता. फडणवीस यांनीही खडसेंच्या या आरोपांना प्रत्युत्तर करताना ‘त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही अडचणी होत्या तर त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करायला हवी होती,’ असं म्हटलं आहे.
‘एकनाथ खडसे आज जे माझ्याबद्दल बोलतायेत ते अर्धसत्य आहे. त्यामुळं योग्य वेळ आल्यावरच प्रतिक्रिया देईन. छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता असो किंवा मोठा नेता असो पक्ष सोडून गेल्यानंतर पक्षाचं थोड नुकसान होतच असतं. पण, भाजप हा मोठा पक्ष आहे कोणाच्या येण्यानं व जाण्यानं पक्ष थांबत नसतो. जळगाव जिल्हा हा भाजपचा जिल्हा आहे. भाजप तिथं आधीपासूनच मजबूत आहे त्यामुळं जनतेचा भाजपवर विश्वास आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
भाजपमधून कोणीही जाणार नाही
एकनाथ खडसेंनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपचे अजूनही काही आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं आहे तसंच, अर्जून खोतकर यांनी पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं अशी ऑफरही दिली होती. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ‘भाजपातील कोणताही नेता राष्ट्रवादीत जाणार नाही. ज्यांचे स्वतःच काही खरं नाही ते काय ऑफर देणार. त्यांना पक्षात कोण विचारतं का?.’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times