वाचा:
नेटकरी म्हणतात हेच राजीनामा पत्र इंग्रजीत असते तर त्यातील चुकांची चर्चा झाली असती. मात्र, मराठी शुद्धलेखनाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. राजकारण्यांनाही त्याचे काही देणेघेणे नसल्याचे वातावरण आहे. आपले राजीनामापत्र राज्यभर व्हायरल होणार, हे ठावूक असताना ते बिनचूक करणे खडसे यांना महत्वाचे का वाटले नाही? असा प्रश्न उपस्थित करून नेटकऱ्यांनी यासाठी नेत्यांच्या सहायकांना जबाबदार धरले आहे. अनेक नेत्यांचे सहायक, त्यांचे सोशल मीडिया हँडलर शुद्धलेखनाकडे लक्ष देत नाहीत. नेत्यांचे दोन ओळीचे राजीनामापत्र जर बिनचूक होत नसेल तर इतरांनी यातून काय बोध घ्यावा? त्यामुळे या चुकांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वेगळा संदेश देण्यासाठी राजीनामा फेटाळण्यात यावा, असे मतही काही नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
वाचा:
अहमदनगरमधील शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी खडसे यांच्या राजीनामापत्रातील चुका लक्षात आणून दिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये ही चर्चा सुरू झाली आहे. कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, हे राजीनामा पत्र जर इंग्रजीत असते तर फक्त स्पेलिंगच्या चुकांसाठी गाजले असते, पण मराठीत शुद्धलेखन दुर्लक्षित असते. मीही अनेक शब्द चुकतो पण दोन ओळींच्या राजीनामा पत्रात किती चुका असाव्यात? प्रती शब्द प्रति असा हवा, वैयक्तीक शब्द वैयक्तिक असा हवा, प्राथमीक शब्द प्राथमिक हवा, ऑक्टोबरवर टिंब दिलाय तो नको, महसुल शब्द महसूल असा हवा, कृषीमंत्री शब्द कसा लिहावा? विधानसभा हे जोडून हवे.
या पोस्टवर अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. काहींना चुका अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे तर काहींनी अशा चुका काढणेच अयोग्य असल्याचे म्हटले आहे. व्याकरणाच्या चुकांमुळे हे पत्र भाजपा अध्यक्षांनी नाकारून परत करावे व अचूक पत्र ११ वेळा लिहिण्याची शिक्षा करून नंतरच पत्र पाठवावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. राजकारण्यांच्या शुदधलेखनाच्या चुका शोधण्यासोबतच त्यांच्या कामातील चुकाही शोधल्या पाहिजेत, असेही मत व्यक्त झाले आहे. तर कोणी राज्यपालांच्या पत्रातही शुद्धलेखनाच्या चुका असल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times