म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर: येथे एका ३५ वर्षांच्या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना बुधवार २१ ऑक्टोबर रोजी सकाळी त्याच्या पत्नीच्या मोबाइलवर व्हिडिओ आल्याने उघडकीस आली. भीमराव दिगंबर सावते (रा. मातोश्रीनगर गल्ली नंबर १) असे मृताचे नाव आहे. अज्ञात मारेकऱ्यानेच मृताच्या मोबाइलवरून हा व्हिडिओ पाठवला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भीमराव याची पत्नी दोन महिन्यांपासून मुलासह माहेरी (मंगरूळ ता. मानवत, जिल्हा परभणी) येथे गेल्याने मृत एकटाच राहत होता. बुधवारी सकाळी सहा वाजता त्यांच्या पत्नीच्या मोबाइलवर भीमरावचा जखमी अवस्थेतील व्हिडिओ दिसला, त्यानंतर नऊच्या सुमारास संशयित आरोपीने फोन करून अपघात झाल्याचे सांगितले. तिचे वडील रांजणगाव येथे आले असता त्यांना भीमराव मृतावस्थेत आढळले. त्यांचा चेहरा व हातावर तीक्ष्ण हत्याराचे एकापेक्षा जास्त वार केलेले आहेत. भीमराव ट्रान्स्पोर्टचा व्यवसायिक असून त्यांच्याकडे आयशर ट्रक आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता बिर्याणीची एक संपवलेली व एक भरलेली प्लेट, दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या. त्यावरून भीमराव सोबत रात्री कोणीतरी होते, दारू पिल्यानंतर वाद होऊन किंवा पूर्ववैमनस्यातून खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी बदला घेतला

मारेकऱ्याने मृताच्या मोबाइलवरूनच आणखी एकला फोन करून ‘मी बदला घेतला,’ असे सांगितल्याने मारेकरी नातेवाईक किंवा ओळखीचा असावा, असा अंदाज आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here