मुंबईः देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये २७ जानेवारीपासून मॉल, पब, मल्टिप्लेक्स, दुकाने आणि हॉटेल-रेस्टॉरंट २४ तास सुरू राहणार आहेत. पर्यावरण व पर्यटनमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेत मुंबई पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

मॉल्स, मल्टिप्लेक्स, दुकाने आणि हॉटेल्स सुरू राहिल्याने राज्याला अधिक महसूल प्राप्त होईल. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी प्रतिक्रिया पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या निर्णयासंदर्भात दिली.

मुंबईत २५ मोठे मॉल, शेकडो हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापने आहेत. ही आस्थापने २४ तास आपली दुकाने सुरू ठेऊ शकतात. हा निर्णय पूर्णपणे व्यापाऱ्यांवर अवलंबून असेल. २४ तास दुकाने सुरू ठेवण्यासंदर्भात प्रशासनाकडून कोणताही दबाव आणला जाणार नाही, असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी स्पष्ट केले.

नव्या नियमानुसार, आठवड्याभरात आस्थापन कोणत्या दिवशी बंद ठेवायचे, याचा निर्णय व्यावसायिकांचा असणार आहे. मद्यविक्री करणारी दुकाने व आस्थापने रात्री १.३० वाजेपर्यंतच खुली असतील.

भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. मुंबईत हाँटेल, बार, पब २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण निवासी भागात हॉटेल,पब २४ तास सुरू ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर आमचा कडाडून विरोध राहील, असे शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीदेखील मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याविषयी प्रस्ताव ठेवला होता. मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स, पब २४ तास सुरू ठेवावेत, याचा पुरस्कार केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here