खंडणीच्या गुन्ह्यात तपास करत असताना अटकेत असलेला खालिद गुड्डूच्या कार्यालयाची भिवंडी गुन्हे शाखाने झडती घेतली होती. या झडतीत कार्यालयामध्ये ३८ कोऱ्या शिधापत्रिका आणि ३० आधारकार्ड मिळाले होते. शिधापत्रिकेवर सही आणि शिक्काही होता. कोऱ्या शिधापत्रिकांबाबत गुन्हे शाखेने शिधावाटप अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. मात्र, या शिधापत्रिका शिधावाटप कार्यालयातून देण्यात आलेल्या नसल्याची बाब पुढे आली. या शिधापत्रिकेवर शासनाचा राजमुद्रा असलेला शिक्काही आहे. मात्र हा शिक्का शिधावाटप कार्यालयातील नाही. शिवाय ३० आधारकार्डपैकी ४ आधारकार्ड बनावट असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. यातील दोन आधारकार्ड असलेल्या फोटोवरून संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते. परंतु आधारकार्डवरील फोटो, नाव आणि पत्ता हे दुसऱ्याच व्यक्तींचे असल्याचे बाब समोर आली. याबाबत खालिद गुड्डूकडे केलेल्या चौकशीमध्ये शिधापत्रिका या निवडणुकीच्या दरम्यान विश्वासू लोकांचे नाव, पत्ता टाकून मतदान करण्यासाठी बनवून घेतल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले आहे. अशा प्रकारे बनावट दस्तावेज बनवून शासनाची फसवणूक केल्याने खालिद आणि त्याचा भाऊ इप्तेकर उर्फ बबलू विरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यांची मालिका कायम
खालिद गुड्डू याच्याविरोधात गुन्हे दाखल होण्याची मालिका काही थांबलेली नाही. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत २५ पेक्षाही अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. खंडणी, फसवणुकीसह इतर स्वरूपाचे गुन्हे खालिदविरोधात दाखल आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times