साताराः ‘माजी मुख्यमंत्री यांनी अत्यंत कुशलपणे पाच वर्षे राज्याचा कारभार चालवला याचा पोटशूळ काहींना उठला आहे. यामुळे एकनाथ खडसे यांचा गेम करून फडणवीसांवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांना पक्षात घेतले आहे,’ अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी केली आहे. प्रवीण दरेकर हे आज गुरुवारी सातारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आले असता सातारा येथील सर्किट हाऊसवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य शासनावर टीका केली .

‘देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडून त्यांची इमेज बदनाम करण्यासाठी खडसे यांचा वापर करण्यात आलेला आहे. खडसेंचा गेम करून फडणवीसांवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने खडसे यांना आपल्या पक्षात घेतले आहे. खडसे यांनी आता गेलेल्या ठिकाणी राहून समाजोपयोगी कार्य करावे आम्ही त्यांना नांदा सौख्यभरे असेच म्हणतो, असे यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले.

‘अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाले असताना अशा वेळी राज्य शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे तसेच त्यांना आर्थिक मदत करणे जरुरीचे आहे .मात्र सध्या राज्य शासन हे सुशांत सिंह प्रकरणात वकील नेमण्यासाठी गुंतले आहे. या वकिलांसाठी १५ लाखांची तरतूद केली जात असताना ती शेतकऱ्यांसाठी का केली जात नाही आणि या उलट केंद्राकडे बोट दाखवले जाते हे अत्यंत चुकीचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.

‘महाराष्ट्रात एखाद्या घटनेत सीबीआय चौकशी सुरू होण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शासनाने याबाबत हा निर्णय घेतला आहे मात्र देशाचा व सर्व घटक राज्यांचा कारभार हा राज्यघटनेनुसार चालतो. कुठल्याही प्रकरणात राज्य आणि केंद्र संघर्ष उभा राहणे हे लोकशाहीला मारक ठरणारे आहे. तसेच हे आपल्या व्यवस्थेला देखील परवडणारे नाही आणि यामुळे अशांतता पसरली कायद्याने जो मार्ग दाखवला आहे तो सगळ्यांनी अंगीकारणे आवश्यक आहे,’ असेही प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रवीण दरेकर यांनी सातारा तसेच जावली तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी केली. या वेळेला सातारा व जावली तालुक्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले त्यांच्यासोबत होते. पीक नुकसानीची पाहणी केल्यानंतर बोलताना दरेकर म्हणाले की, ‘शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांसाठी या राज्य सरकारवर दबाव आणून मदत दिली जाईल. सातारा जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झालेले असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी लागेल ती मदत करण्यास आम्ही तत्पर आहोत, असे सांगून त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here