नागरिकत्त्व देण्यापूर्वी संबंधित नागरिकांना सात वर्षे भारतात राहावे लागते; तसेच नागरिकत्त्वाचे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी १२ महिने मूळ देशाशी संपर्क ठेवावा लागत नाही. या नागरिकांची माहिती गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांकडून घेण्यात आलेली असते. त्यानंतरच त्यांना भारतीय नागरिकत्त्व देण्यात येते. त्यानुसार रितिक जेसोमल मखिजा, अनमोल भगोमल मखिजा, त्याची बहिण प्रियांका आणि रमेश घनशामदास या चौघांना भारतीय नागरिकत्त्व देण्यात आले आहे. हे नागरिक सध्या ‘लाँग टर्म व्हिसा’ घेऊन राहत होते. प्रत्येक वेळी त्यांना पासपोर्ट, व्हिसाचे नूतनीकरण करणे आणि अन्य सरकारी सोपस्कार पार पाडावे लागत होते. आता त्यांची या त्रासातून कायमची सुटका झाली आहे.
भारतीय नागरिकत्त्व प्रमाणपत्र देण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचे पालन करण्याबाबतची शपथ परदेशी नागरिकांना देण्यात येत असते. त्यानुसार १७ पाकिस्तानी आणि एका बांगलादेशी नागरिकाला शपथ देण्यात आली. या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भारतीय नागरिकत्त्व देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. अमेरिका, केनिया आणि फिलिपिन्स या देशांतील सात नागरिकांनाही शपथ देण्यात आली. या नागरिकांना भारतीय नागरिकत्त्व देण्याची प्रक्रिया केंद्र सरकारकडून होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
भारतीय नागरिकत्त्व दिलेल्या चार पाकिस्तानी नागरिकांच्या कुटुंबांतील अन्य सदस्यांनी यापूर्वी भारतीय नागरिकत्त्व घेतले आहे. आता या नागरिकांचेही भारतीय नागरिकत्त्व मिळविण्याचे स्वप्न साकार झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times