इराण, इराकमधील परदेशी कांद्याबरोबरच इंदोरमधूनही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाल्याने गुरुवारी कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे घाऊक बाजारात ८० ते ८५ रु. किलोपर्यंत गेलेला कांद्याचा दर ६० ते ७० रु. किलोपर्यंत खाली आला आहे. मात्र दरातील ही घसरण काही दिवसच राहण्याची शक्यता असून त्यानंतर पुन्हा कांद्याच्या दरात तेजी कायम राहील, असे व्यापारी सांगत आहेत.
परतीच्या पावसानानंतर कांद्याचे झालेले नुकसान लक्षात घेता कांद्याचे दार वाढायला सुरुवात झाली होती. हे दर घाऊक बाजारात ८० ते ८५ रु. किलोपर्यंत गेले होते. त्यामुळे किरकोळ बाजारात कांदा शंभरीत पोहचला आहे. आजही किरकोळ बाजारात हा कांदा १०० रु. किलो दरानेच विकला जात आहे. गुरुवारी घाऊक बाजारात ७६ गाड्या कांद्याची आवक झाली. आत्तापर्यंत बाजारात दिवसाला सरासरी ५० गाड्या येत होत्या. कालपर्यंत गाड्यांची आवक ६० वर गेली, तर गुरुवारी चक्क ७६ गाड्या कांदा आल्याची नोंद झाली आहे. कांद्याची आवक वाढली असल्याने त्याचा परिणाम दरावर झाला असून दर खाली येण्यास सुरुवात झाली आहे.
गुरुवारी नेहमीच्या तुलनेत कांद्याची आवक वाढली आहे. परदेशी ५० ते ५५ रुपये किलोच्या घरात असल्याने हॉटेल व्यवसायिकांकडून या कांद्याला मागणी होती. त्यामुळे काही प्रमाणात ग्राहक हा परदेशी कांद्याकडे गेला. शिवाय किलोमागे दर ८० रुपयांच्या घरात गेल्याने कांद्याला उठावही कमी झाला आहे. अनेक खरेदीदारांनी कांदा खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली.
पुन्हा दरात तेजीची शक्यता
आता काही दिवस ही घसरण कायम राहणार आहे. मात्र मुळातच कांद्याचे उत्पादन कमी असल्याने यावेळी कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर होण्याची दाट शक्यता असल्याचे मत कांदा बटाटा आडत संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नंतर कांद्याची दरवाढ कायम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times